(रत्नागिरी)
कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा रत्नागिरीचा आरोपी पॅरोलवरील रजेचा गैरफायदा घेऊन फरार झाला. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुन्हा पकडले. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मुईन मोहम्मद युसूफ काझी ऊर्फ मोईन ऊर्फ रॉनी बिझा ऊर्फ हेमंत शहा (वय ३३, रा. कुवारबाँव, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.
कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला मोईन हा फरार झाल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मोईन याने आपला गुन्हा न्यायालयापुढे कबूल केला. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन काझी याने तालुक्यातील पोमेंडी- बुद्रुक येथे शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या अभिजित शिवाजी पाटणकर या तरुणाचा तीन गोळ्या झाडून निघृण खून केल्याचा आरोप होता. या आरोपाखाली सत्र न्यायालयाकडून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार मोईन काझी हा कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कोल्हापूर कारागृह प्रशासनाने मोईन याला ८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ अशी २८ दिवसांची पॅरोलवरील रजा मंजूर केली होती. त्यानुसार मोईन काझी हा कारागृहातून बाहेर पडला होता. रजेच्यापूर्वी ५ ऑगस्ट २०२३ ला तो पुन्हा कारागृहात हजर होणे अपेक्षित असताना तो फरार झाला.
या प्रकरणी मोईन काझी याच्याविरुद्ध भादंवि कलम २२४ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांनी मोईन याला ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले. यावेळी मोईन काझी याने आपला गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.