(मुंबई)
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बँक असलेल्या एस.टी. बँकेचा सीडी रेषो ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एस.टी. बँकेतून कर्ज देणे बंद करण्याचे सोमवारी तोंडी आदेश दिले. त्याची अंमलबजावणी मंगळवार, १६ जानेवारीपासून करण्याचा निर्णय एस.टी. बँकेने घेतला. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांना आता कर्ज मिळणार नाही. याशिवाय येत्या काही दिवसांत बचत खात्यांतून पैसे काढण्यावरही बंधने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बँकेचा कारभार ३० जून २०२३ पासून गुणरत्न सदावर्ते यांच्या कष्टकरी पॅनेल संघटनेच्या नवीन संचालक मंडळाच्या हाती गेला. तेव्हापासून बँक चालविण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना, रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवत सदावर्ते यांनी मनमानी निर्णय घेण्याचा सपाटा लावला. त्यामुळे बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवीदारांनी काढल्या. त्यामुळे बँकेचा सीडी रेषो ९८ टक्क्यांवर गेला आहे. बँकेचा सीडी रेषो सामान्य ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक आहे