(मुंबई)
भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार २०२० चा अपवाद वगळता आजपर्यंत हिंदी सिनेसृष्टीची मायभूमी असलेल्या मुंबईतच आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटीला झाला होता. फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे ६९वे वर्ष आहे, परंतु यंदाचा फिल्म फेअर पुरस्कार २०२४ सोहळा गुजरातला होणार आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांपाठोपाठ आता फिल्म फेअर पुरस्कार सोहळाही गुजरातला पळवून नेण्यात आल्याचा सूर उमटत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली. ही पत्रकार परिषद जियो वर्ल्ड सेंटरमध्ये घेण्यात आली होती. यावेळी निर्माता करण जोहर, अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील मंडळी उपस्थित होती. यंदा हा पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी या २ दिवसात संपन्न होणार आहे. गुजरात टुरिझमच्या मदतीने हा सोहळा पार पडणार असून अनेक बॉलिवूड तारे- तारकांची त्याला हजेरी लागणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन २००१ पासून निर्माता करण जोहरच करीत आला आहे व यंदाच्या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्याच्यावरच सोपवण्यात आली आहे