(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री तीन दुकानांमध्ये झालेल्या चोरीबाबत पोलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. यातील चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज हाती असल्याने ते लवकर सापडण्याची अपेक्षा आहे.
याबाबतची फिर्याद विनायक कृष्णा मोरे (रा. सावर्डे) यांनी दिली आहे. विनायक मोरे यांच्या दुकानातून ५८ हजार ७०० रुपयांचे साहित्य, डॉ. अक्षय मोहिते यांच्या दवाखान्यातून २० हजारांची रोख रक्कम तसेच भीमजी पटेल यांच्या हार्डवेअरमधून सात हजार रुपये असा ८५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
या चोरीच्या घटनेनंतर चोरट्यांच्या शोधासाठी बाजारपेठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्याकरिता सावर्डे पोलिसांचे एक पथकही तयार करण्यात आले आहे.