(नवी दिल्ली)
भारतीय वायुदलाला रविवारी पहिले स्वदेशी ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र मिळाले आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे आहे. ते बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) म्हणजे नजरेच्या पलीकडील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. भारतीय संरक्षण संशोधन संस्था अर्थात् डीआरडीओने विकसित केलेले अस्त्र क्षेपणास्त्र सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि तेजस या लढाऊ विमानात बसवले जाणार आहे.
तेजस एमके 2, एएमसीए आणि टीईडीबीएफ लढाऊ विमानांमध्येही ते बसवण्याची योजना आहे. अस्त्र क्षेपणास्त्रात ‘ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूज’ आहे, जे क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक नजर ठेवते. लक्ष जागचे हलले तरी त्यावर अचूक निशाणा साधून मारा करण्यात हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
बियाँड व्हिज्युअल रेंज हा हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा प्रकार आहे. ही क्षेपणास्त्रे साधारणपणे नजरेच्या टप्प्याच्या पलीकडील म्हणजे 20 नॉटिकल मैल किंवा 37 किलोमीटरच्या पलीकडील लक्ष्य भेदण्यात सक्षम असतात. या प्रकारातील क्षेपणास्त्रामध्ये असलेल्या ड्युएल पल्स रॉकेट मोटर किंवा बूस्टर रॉकेट मोटरच्या साहाय्याने त्यांना एवढ्या दूरवरील अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी सक्षम केले जाते. अतिशय दूरवरील लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेसोबतच बीव्हीआर क्षेपणास्त्रे आधीच निश्चित केलेल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सक्षम असतात. या क्षेपणास्त्रांमध्ये अतिशय दूर अंतरावरील लक्ष्य विमानातून निश्चित करण्याची यंत्रणाही कार्यान्वित आहे.
अस्र क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
– अस्त्र क्षेपणास्त्रात ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्युज
– फ्युजमुळे अचूक निशाणा साधणे सहज शक्य
– वजन 154 किलो, लांबी 12.6 फूट
– मारक क्षमता 160 किमी, 350 किमीपर्यंत वाढवणे शक्य
– 66 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते
– 5556.6 किमी वेगाने शत्रूचा पाठलाग