(संगमेश्वर/ एजाज पटेल)
तालुक्यातील डिंगणी खाडेवाडी येथील सुमारे ८०० मीटर रस्त्यासाठी तब्बल २० लाख रुपये खर्चून देखील काम अतिशय निकृष्ठ होत असल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत असून ठेकेदाराने खडी आणि डांबर नेमके कोणत्या दर्जाचे वापरले ? याचा शोध घेण्याची गरज असल्याची मागणी वाहन चालक व ग्रामस्थ करत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यात डिंगणी रस्त्यावरून खाडेवाडी येथे जाण्यासाठी अंतर्गत रस्ता आहे. कालांतराने हा रस्ता खराब झाला होता. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, मजबूत असे खडीकरण व डांबरीकरण व्हावे अशी मागणी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थ व वाहन चालक करत होते. त्यांच्या मागणीची दखल घेत या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाला मंजुरी देण्यात आली, तसेच या कामासाठी तब्बल २० लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला.
निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एका राजकीय पदाधिकाऱ्याने कामाचा ठेका मिळवला व काम सुरू देखील झाले. सुमारे ८०० मीटर इतक्या कामाला २० लाख रुपये आणि ठेकेदार देखील आपल्या ओळखीचा असल्याने काम दर्जेदार व मजबूत होईल या विश्वासामुळे ग्रामस्थ देखील खुश झाले. परंतु काम सुरू होताच त्यांचा भ्रमनिरास झाला. सुरुवातीपासूनच काम निकृष्टपणे सुरू होते. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची व्यवस्थित देखरेख या कामावर नसल्याने ठेकेदार व कामगारांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे काम सुरू ठेवले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की, पायी चालताना देखील खडी आणि डांबर उखडले जात आहे. त्यामुळे ठेकेदाराने येथे कोणत्या दर्जाचे साहित्य वापरले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाकडे या बाबत काहींनी विचारणा केली असता काम योग्य असल्याची सारवासारव अधिकाऱ्यांकडून केली जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता ठेकेदारही ओळखीचा असल्याने त्याला जास्त बोलूही शकत नाही अशी ग्रामस्थांची अडचण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, आणि चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कामाचे बिल अदा करू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच झालेले निकृष्ठ काम त्या ठेकेदाराकडून पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे आणि तज्ञ अधिकाऱ्यांकडून कामावर देखरेख ठेवण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.