(मुंबई)
अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा संदर्भात शंकराचार्यांशी संबंधित वाद थांबताना दिसत नाही. दरम्यान, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी या विषयावर आपले मत उघडपणे मांडले आहे. राम मंदिरातील रामलला प्राण प्रतिष्ठामध्ये कोणते अशास्त्रीय काम केले जात आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला विरोध केलेला नाही. मी हे म्हंटले की, जे कार्य केले जाणार आहे ते होऊ शकत नाही, कारण मंदिर अद्याप अपूर्ण आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होणे प्रशस्त असते. ही धर्मशास्त्राची बाब आहे आणि आम्ही ज्या जागेवर बसलो आहोत, तिथे धर्माच्या बाबतीत काही कमतरता असेल तर ते निदर्शनास आणून देण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही तेच करत आहोत, याला विरोध म्हणत नाहीत.”
निमंत्रण मिळूनही रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला न जाण्याबाबत ते म्हणाले, “निमंत्रण मिळाल्यावर कुठेतरी जाणे ही वेगळी गोष्ट आहे. तिथे उपस्थित राहून आमच्यासमोर अशास्त्रीय विधी होत असल्याचे पाहणे ही वेगळी गोष्ट आहे. आम्ही आमच्या हिंदू समाजाला उत्तरदायी आहोत. आमच्या समोर काही अशास्त्रीय होत असेल तर जनता आम्हाला विचारते की तुम्ही उपस्थित असताना हे घडले. तुम्ही मुद्दा का मांडला नाही? त्यामुळे आम्हाला आमचे काम करायचे आहे. ”
हे चुकिचं घडतंय!
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “जर मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असेल तर ते मंदिर पूर्णपणे बांधले गेलेले पाहिजे. काही लोकांना हे समजत नाही, कारण त्यांना धर्मशास्त्राचे ज्ञान नाही. लोक म्हणतात गर्भगृह बांधले आहे, भलेही बाकीचे बांधकाम अपूर्ण असूदे. बहुतेक लोकांचे मत आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, पण तसे नाही, मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
ते म्हणाले, “मंदिर हे देवाचे शरीर आहे, त्यातील मूर्ती म्हणजे आत्मा आहे. मंदिराचे शिखर हे देवाचे डोळे आहेत, कळस हे देवाचे मस्तक आहे आणि मंदिरातील ध्वज हे देवाचे केस आहेत. डोके आणि डोळे नसलेल्या शरीरात प्राणप्रतिष्ठा करणे बरोबर नाही हे आपल्या शास्त्राच्या विरुद्ध आहे.” एबीपी न्यूजशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ही माहिती दिली.