(रत्नागिरी)
आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित 17 वा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी 2024 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये होणार असून यावर्षी हा महोत्सव पंडित कुमार गंधर्व, पंडित सी आर व्यास आणि पंडित राम मराठे या तीन दिग्गज कलाकारांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त साजरा करण्यात येत आहे. याचसोबत ओडिसी नृत्यशैलीमधील प्रख्यात कलाकार झेलम परांजपे यांचे सादरीकरणदेखील या महोत्सवामध्ये रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे.
रत्नागिरीच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रामधला मानाचा तुरा असणार्या या महोत्सवामध्ये पंडित योगेश शमसी, भुवनेश कोमकली, संजीव चिम्मलगी, भाग्येश मराठे, दिलशाद खान, अनुपमा भागवत यांसारख्या दिग्गज आणि तरूण कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कलाकारांसोबत साथसंगतीला वरद सोहोनी, चिन्मय कोल्हटकर (संवादिनी), यशवंत वैष्णव (तबला) यांचे वादनही असणार आहे. गेली सोळा वर्षे अखंड सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे कोकणामधील संगीत रसिकांसाठी एक मेजवानी असते.
महोत्सवाची सुरुवात 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता दिलशाद खान यांच्या सारंगीवादनाने होईल. त्यांना तबला साथ यशवंत वैष्णव करतील. त्यानंतर पंडित राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचे गायन होईल. त्यांना तबला साथ यशवंत वैष्णव यांची असेल तर संवादिनी साथ रत्नागिरीचेच सुपुत्र वरद सोहोनी करतील.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी 10 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता ओडिसी नृत्यगुरू झेलम परांजपे यांचे नृत्य सादर होईल. त्यानंतर आठ वाजता प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सी आर व्यास यांचे गंडाबंध शिष्य संजीव चिम्मलगी यांचे गायन सादर होईल. त्यांना तबल्यावर साथ कौशिक केळकर यांची असेल आणि संवादिनी साथ चिन्मय कोल्हटकर करतील.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 11 फेब्रुवारी 2024 रोजी, संध्याकाळी सात वाजता अनुपमा भागवत यांचे सतारवादन सादर होईल. त्यांना तबला साथ पंडित योगेश शमसी करतील. त्यानंतर आठ वाजता पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांचे गायन सादर होईल. त्यांना संवादिनीवर साथ अभिषेक सिनकर करतील आणि तबलासाथ आशय कुलकर्णी यांची असेल.
आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे अशा पद्धतीने या तीन सादरीकरणामधून पंडित कुमार गंधर्व, पंडित सी आर व्यास आणि पंडित राम मराठे या तीन दिग्गज कलाकारांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मानवंदना देण्यात येणार आहे.