(रत्नागिरी / जिमाका)
विभागीय क्रीडा स्पर्धा भरवण्याची चांगली परंपरा महसूल विभागाने राखली आहे, असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढले. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३- २४ चे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करुन आणि रंगीत फुगे हवेत सोडून, महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, महसूलचे अपर मुख्य सचिव डाॕ राजगोपाल देवरा, आयकर विभागाच्या आयुक्त डाॕ माधवी आर एम, विभागीय आयुक्त डाॕ महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, यजमान पद मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्याने खूप चांगले आयोजन केले आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन ! अशा स्पर्धांमधून विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळखी होतील. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल, असे सांगून त्यांनी या तीन दिवसीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यात स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्राला विकासात्मक दृष्टीने पुढे नेणं हाच महसूलचा उद्देश आहे. महसूल आणि पोलीस खात्याला शासनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते महत्त्व असेच टिकवून ठेवावे. याच या निमित्तानं शुभेच्छा देतो.
आमदार श्री. जाधव यांनी महसूल विभागाने देशाची यंत्रणा मजबूत केल्याचे सांगून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळावा, अशा शुभेच्छा दिल्या. विभागीय आयुक्त डाॕ कल्याणकर म्हणाले, महसूल विभाग वेगवेगळ्या पध्दतीची कामे वर्षभर करत असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने या जिल्ह्यातून नव चैतन्य घेवून आपा-पल्या जिल्ह्यात चांगले काम करु. गुणांना वाव देवू हिरिरीने काम करु. हाच या क्रीडा स्पर्धांचा उद्देश आहे. त्या यशस्वी करु.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकेत क्रीडा स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.
नासा व इस्रोसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा यावेळी भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खेळाडुंनी संचलन करुन मानवंदना दिली. यानंतर खेळाडुंना प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी शपथ दिली.
संचलनमधील प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- रायगड, तृतीय- मुंबई उपनगर. १०० मिटर धावणे पुरुष प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- सिंधुदुर्ग, तृतीय- रायगड. १०० मिटर धावणे महिला प्रथम- रत्नागिरी, द्वितीय- रायगड, तृतीय- सिंधुदुर्ग. विजेत्यांना महसूल मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सर्वांचे आभार मानले.