(रत्नागिरी)
नागपूर येथून गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (९ जानेवारी) रात्री घडली. संजय प्रभाकरराव शेंडे (६१, रा. त्रिमूर्तीनगर नागपूर) असे त्यांचे नाव आहे.
या घटनेची नोंद जयगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. संजय शेंडे व त्यांचे मित्रपरिवार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नागपूरहून कुडाळ, मालवण असा प्रवास करून गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. गणपतीपुळे येथील एका लॉजवर विश्रांती घेत असताना शेंडे यांच्या अचानक छातीत दुखू लागले. तसेच, त्यांना अस्वस्थ वाटू लागले व बोलायलाही त्रास होऊ लागला.
त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या मित्राने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर वाटत असल्याने त्यांना तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.