जय जय रघुवीर समर्थ. केवळ ब्रम्ह असे जे बोलले ते अनुभवाला आले आणि मायेचाही अर्थ समजला. ब्रम्ह आतमध्ये प्रकाशते आणि माया प्रत्यक्ष दिसते, आता हे द्वैत कशाप्रकारे समाप्त होईल? तरी आता सावधान होऊन, आपले मन एकाग्र करून माया, ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घ्या. ब्रम्हा चा संकल्प सत्य, तर मायेचा विकल्प मिथ्या. अशा प्रकारची द्वैताची कल्पना मनच करते. ब्रह्म जाणतो आणि मायाही जाणतो त्या अवस्थेला तुर्यावस्था म्हणतात. सर्व जाणत असल्यामुळे ही सर्वसाक्षी अवस्था आहे. या अवस्थेमध्ये सर्व जाणता येते, पण सर्वच नसते, ते काय? हे कसे जाणता येईल?
संकल्प-विकल्प सृष्टी मनाच्या पोटात जन्म घेते ते मनच खोटे आहे तर साक्ष कशी येईल? साक्षित्व, चैतन्यत्व व सत्ता हे गुण ब्रह्माच्या डोक्यावर मायेमुळे उगीचच चिकटवले जातात. घट आणि मठ यांच्यामुळे आकाश तीन भागात विभागले जाते असे बोलणे म्हणजे घट आकाश मठआकाश आणि महदआकाश अशा तीन गुणांमध्ये आकाश आहे असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे मायेचे गुण ब्रह्माला दिले जातात. मायेला खरे मानले तर ब्रह्माला साक्षी म्हणावे लागेल माया आणि अविद्या यांचे हे द्वैत कसे नाहीसे करायचे? म्हणून सर्वसाक्षी मन उन्मन झाले मग तुर्यारूपी ज्ञान मावळून गेले.
ज्याला द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैत-अद्वैताचे अनुसंधान सुटले. इथे द्वैत आणि अद्वैत या वृत्तीचा संकेत मिळतो, पण वृत्तीच निवृत्त झाली तर द्वैत कसे राहील? वृत्तीरहित जे ज्ञान ते पूर्ण समाधान असून त्यामुळे माया ब्रह्माचे अनुसंधान सुटते, जाणीव तुटते. माया ब्रह्म असा मनाने कल्पना केलेला संकेत आहे. ब्रह्म कल्पनारहित आहे असे ज्ञानी लोक जाणतात. बुद्धीला न समजणारे, कल्पनेच्याही पलिकडचे, ते अनुभवले तर खरोखर आपण तेच होतो, त्यामुळे द्वैत राहत नाही. द्वैत पाहिले तर ब्रह्म नसते ब्रह्म पाहिले तर द्वैत नसते, द्वैत अद्वैत हे कल्पनेमध्येच भासते. कल्पना मायेचे निवारण करते, कल्पना ब्रह्म स्थापित करते, कल्पना संशय धरते आणि निवारण करते. कल्पनाही बंधनात अडकवते, कल्पना समाधान देते, ब्रह्माची जाणीवही कल्पनाच देते. कल्पना ही द्वैताची माता आहे, केवळ ज्ञान ही कल्पना आहे. बंधन आणि मुक्ती हेही कल्पनेमुळे आहे.
मनामध्ये कल्पना असेल तर ब्रह्म म्हणून गोलाकार तेजस्वी काहीतरी दृश्य दाखवते, पुन्हा क्षणांमध्ये निर्मळ स्वरूप कल्पना करते. एका क्षणी धोका देते, एका क्षणी स्थिर राहते. एका क्षणी विस्मित होऊन पाहते. एका क्षणामध्ये उमजते, एका क्षणामध्ये गोंधळवते. नाना विकार करते ती कल्पना जाणावी. कल्पना म्हणजे जन्माचे मूळ, कल्पना म्हणजे भक्तीचे फळ, कल्पना हीच केवळ मोक्षाची दात्री. अशी ही कल्पना समाधानाचे साधन देते, अन्यथा कल्पना म्हणजे पतनाचे मूळ होय. म्हणून या सर्वांच मूळ केवळ कल्पना आहे कल्पना समूळ नष्ट केली की मगच ब्रम्हप्राप्ती होते. श्रवण आणि मनन निजध्यासामुळे समाधान होते, कल्पनेचे खोट्या कल्पनेचे भान उडून जाते.
शुद्ध ब्रह्माचा निश्चय कल्पनेचा जय करतो आणि निश्चितपणे संशय नाहीसा होतो. खोट्या कल्पनेचे कोडे सत्यापुढे कसे उभे टिकणार? ज्याप्रमाणे सूर्याच्या उजेडामुळे अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशाने खोट्या कल्पनेचा नाश होतो. मग सहजपणे द्वैताचे अनुसंधान तुटते. अशाप्रकारे ब्रह्माची माहिती समर्थ देत आहेत. पुढील माहिती ऐकू पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127