(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
महाराष्ट्र राज्यातील अंशतः विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दिल्याशब्दाप्रमाणे १ जानेवारी २४ पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा व तसा शासन निर्णय जाहीर करा व उर्वरित टप्पे प्रत्येक वर्षी नैसर्गिक टप्पा वाढीने १ जानेवारी पासून देण्यात यावेत, या एकमात्र मागणीसाठी शिक्षक संघटनांच्या अनेक शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला धार आली असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी व शासन निर्णय जारी करावा असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे.
गेली २० वर्षाहून अधिक काळ शोषण झालेल्या शिक्षकांना हक्काच्या वेतनाचा वाढीव टप्पा देत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. शासनाने अंत पाहू नये, यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा आझाद मैदानातून शिक्षक समन्वय संघाने एक मुखाने दिला आहे.
गतवर्षी वाढीव टप्पा दिला त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात ११५० कोटी मंजूर केले, त्यावेळी अभिभाषण करताना छातीला माती लावून नुसतेच ११५० कोटीच नाही तर या सरकारने ५५०० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे दरवर्षी वाढीव टप्पा दिला जाईल असा शब्द दिला होता. ऑक्टोबर मध्ये झालेल्या आंदोलनावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १ जानेवारी २४ पासून वाढीव टप्पा दिला जाईल असे आझाद मैदानावर भाषणात सांगितले होते. शिवाय वाढीव टप्पा देण्यासाठी लेखी पत्र काढून शिक्षण आयुक्तांना तसा प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु शासनाने तशी कोणतीही कार्यवाही न केल्याने शिक्षकांना पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. याचं आंदोलनात शिक्षक समन्वय संघाच्या दीपक कुलकर्णी व सहकार्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केली आहे. प्रगत महाराष्ट्र एकीकडे म्हणताना या राज्यात शिक्षकांना अन्नत्याग आंदोलन करावे लागते हे दुर्दैवी असल्याने शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर शोक व्यक्त करण्यात आला.
आझाद मैदानावर अख्या महाराष्ट्रातून हजारो अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक एकवटले आहेत. महाराष्ट्रातून प्रत्येक अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी आझाद मैदानावर उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
२००१ सालापासून कायम विनानुदनित शब्दाच्या विळख्यात राज्यातील ६५ हजार शिक्षक अडकले आहेत. पिढी घडवण्याचे काम ज्यांच्या हातात आहेत त्यांनाच विनवेतन काम करावे लागते यासारखी दुसरी शोकांतिका नसल्याचे महाराष्ट्रात नसल्याचे मत शिक्षक समन्वयकांनी व्यक्त केले.हे शासनच शिक्षकांचा प्रश्न मिटवू शकते असा विश्वास देखील व्यक्त होत आहे.
सध्या शिक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांकडून आझाद मैदान दणाणून गेले आहे. १००% अनुदान मिळालाच पाहिजे, या मागणीवर समन्वयक व शिक्षक ठाम आहेत. शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.या आंदोलनात प्रा.दीपक कुलकर्णी, खंडेराव जगदाळे, प्रा राहुल कांबळे, प्रा संघपालं सोनोने, प्रा रविकांत जोजारे, प्रा कैलास खानसोळे, के पी पाटील, ज्ञानेश चव्हाण, आनंद करणे, लता गयाली, ज्ञानेश्वर शेळके, असे अनेक शिक्षक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.