(दापोली)
शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला कडलास येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या शाळेची कुमारी श्रीया योगेश हुंबरे (इयत्ता सातवी) या विद्यार्थिनीची १४ वर्षाखालील शालेय कबड्डी या खेळासाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. रांची येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
श्रीया हिला लहान पणापासूनच कबड्डी या खेळाची आवड आहे. आपली आवड तिने सातत्याने टिकवून ठेवली. सातत्य, जिद्द, चिकाटी यामुळेच तिला हे यश प्राप्त करता आले. तिच्या या यशामध्ये तिच्या आई-वडीलांचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. तिचे वडील आणि आई उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. आई-वडीलांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे श्रीयाने एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. श्रीया हुंबरे सध्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल या शाळेत इयत्ता ७ वी ब या वर्गात शिकत आहे. तिला शालेय स्तरावर शाळेचे क्रीडा शिक्षक, कबड्डी खेळाचे राष्ट्रीय पंच समीर कालेकर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
कुमारी श्रीया योगेश हुंबरे हिने हे यश प्राप्त करून संस्थेच्या आणि शाळेच्या ऐतिहासिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल तिचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक संदीप मुंढेकर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.