(संगलट / इक्बाल जमादार)
खेड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूला सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगराळ भाग आहे. तर खालील बाजूला अरबी समुद्राला जोडून असलेली खाडी आहे. त्यामुळे कोकणात कितीही पाऊस झाला तरी ते पाणी समुद्रालाच जाऊन मिळते. याचा परिणाम म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या महिना अखेरीस डोंगराळ भागातील गावांना व वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून अशा सर्व गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सदरील टंचाईची समस्या सोडविण्यासाठी खेड तालुक्याची टंचाई कृती आराखडा सभा दापोली मतदार संघाचे आमदार श्री योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गावचे सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे योग्य राहील यासंबंधीत उपस्थितांनी मांडलेली मते जाणून घेतली. तसेच जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी अपूर्ण असलेले ग्रामपंचायतीचे प्रस्ताव, बक्षीस पत्र व संमत्ती पत्र या संबंधित कागदोपत्रांची पूर्तता करण्यास ग्रामसेवक व सरपंच यांना आदेश दिले. यासोबतच एप्रिल महिन्याअखेर नळपाणी योजनेची रखडलेली सगळी कामे पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना देखील आदेश दिले व खेड तालुका हा पाणी टंचाईमुक्त व टँकरमुक्त कसा होईल हे माझे प्रयत्न राहतील असे उपस्थित नागरिकांना आश्वासित केले.
याप्रसंगी तालुक्याच्या प्रांत सौ. राजश्री मोरे, तहसीलदार श्री. सुधीर सोनवणे, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, जिल्हापरिषदेचे माजी सभापती श्री. आण्णा कदम, जिल्हा सहसंघटक श्री. शंकर कांगणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. चंद्रकांत चाळके, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, श्री. अरविंद चव्हाण, तालुका संघटक श्री. महेंद्र भोसले, माजी पं. स. सभापती श्री. रामचंद्र आईणकर, उप तालुकाप्रमुख श्री. म्हस्कर तसेच विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, उपसरपंच, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.