(गुहागर)
सावकारीच्या विरोधात चिपळूण तालुक्यात मोठी कारवाई सुरु असल्याने व या विरोधात जोरदार उठाव झाल्याने येथील कारवाईचे सावट गुहागर तालुक्यातील सावकारीवर पडू लागले आहे. तालुक्यातील अनेक सावकारांचे धाबे दणाणले असून सर्वाधिक कामगार असलेल्या दाभोळच्या आरजीपीपीएल प्रकल्प परिसरात सावकारी अधिक असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात सावकारी धंद्याने कहर केला आहे. चिपळूणमध्येही सावकारीचा विळखा मोठा आहे. चिपळूणमध्ये महिना १० ते १५ टक्के व्याजाने पैसे देऊन वसुली केली जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. अडलेला माणूस अडचण दूर करण्यासाठी पैसे घेर्ता आणि अधिक अडचणीत सापडतो. कर्ज वसुलीसाठी बाळगलेले गुंड घरात जाऊन धमकी देतात, कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेतल्या जातात, चेकवर सह्या घेतल्या जात आहेत आणि त्यातून कर्जदाराला ब्लॅकमेल केले जात आहे. अशा अनेक घटना घडत आहेत.
कारवाईची करण्याची मागणी
गरजू कामगार, नागरिक आपल्या गरजेनुसार एखाद्याकडून पैसे घेतात. पैसे परत करण्यास विलंब झाला, तर व्याजाला व्याज लावून वसूल केले जाते. यासाठी अनेकदा संबंधित कर्जदाराला धमकावले जाते, वेठीस धरले जाते. काहींना ब्लॅकमेलही केले जाते. मात्र, अशी प्रकरणे अद्याप बाहेर येत नसल्याने गुहागर तालुक्यात सावकारी करणाऱ्यांचे फावले आहे. अनेक सावकार नागरिकांना पैशासाठी वेठीस धरत असल्याचे वृत्त कानावर येत आहे. विशेष करून श्रृंगारतळीसारख्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात सावकारी व्यवसायाचे पेव वाढले आहे. या सावकारांनी पैसे वसुलीसाठी तरुण मुलांची टीम ठेवली असल्याने, राजरोस मोठ्या प्रमाणात नागरिकांना वसुली करणारे त्रास देत आहेत. सावकार कर्ज देताना गोड बोलून देतात, पण वसुलीच्या वेळी जबरदस्तीची भाषा वापरतात. फोनवर धमकावतात, प्रसंगी घरातील एखादी किंमती वस्तू देखील उचलून नेतात. त्यामुळे सावकारीवरील कारवाईसाठी चिपळूण पोलिसांप्रमाणेच गुहागर पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.