जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी आता सावध व्हावे. मी आता ब्रह्मज्ञान सांगत आहे त्यामुळे साधकांचे समाधान होईल. रत्न शोधण्यासाठी माती एकत्रित करावी लागते त्याप्रमाणे चौदा ब्रह्मांची लक्षणे आहेत. पदार्थ नसेल तर त्याचा संकेत देता येत नाही, द्वैतापेक्षा वेगळा दृष्टांत सांगता येत नाही. पूर्वपक्ष सांगितल्याशिवाय सिद्धांत स्पष्ट करता येत नाही. आधी खोटे सांगावे, मग ते ओळखून सोडून द्यावे. पुढे सत्य आपोआप अंतरंगामध्ये शिरते, म्हणून सिद्धांत समजण्यासाठी चौदा ब्रम्हांडांचा संकेत सांगत आहे.
श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. पहिले म्हणजे शब्दब्रम्ह, दुसरे ओम हे मिताक्षरब्रम्ह, तिसरे खं ब्रम्ह असे श्रुतीमध्ये सांगितले आहे. चौथे सर्व ब्रम्ह. पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ताब्रह्म, सातवे साक्षब्रम्ह, आठवे सगुण ब्रम्ह, नववे निर्गुण ब्रह्म, दहावे वाच्यब्रम्ह, अकरावे अनुभव ब्रम्ह, बारावे आनंद ब्रम्ह, तेरावे तदाकार ब्रम्ह, चौदावे अनिर्वाच्य ब्रम्ह अशी ही चौदा ब्रह्मे आहेत. त्यांची नावे मी सांगितली. आता त्यांचे स्वरूप कसे आहे हे सांगतो. अनुभव नसताना निर्माण होणारा भ्रम म्हणजे शब्दब्रम्ह. मितिकाअक्षर्ब्रम्ह म्हणजे एक अक्षर ओम, तर खं शब्दातून आकाश ब्रम्ह व्यक्त होते. सर्वब्रम्ह हे सूक्ष्म आहे. पंचमहाभुतांचे कोडे जे जे तत्त्व दृष्टीला पडते ते ते निर्मल ब्रह्मच आहे. त्याला सर्व ब्रम्ह असे म्हणतात. सर्वं खल्विदं ब्रह्म असे श्रुतीमध्ये त्याच्याविषयी सांगितले आहे. आता चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. पंच भुताच्या मायेमध्ये चैतन्य चेतना निर्माण करते म्हणून त्याला चैतन्य ब्रह्म असे म्हणतात. चैतन्याला ज्याचा आधार असतो त्याला सत्ताब्रह्म म्हणतात. त्या सत्तेला जाणणारा त्याला साक्षब्रम्ह म्हणतात.
ज्याच्यापासून साक्षीत्व मिळते ते गुणांनी युक्त असते त्यामुळे त्याला सगुणब्रह्म असे म्हणतात. जेथे गुण नाहीत ते निर्गुण ब्रह्म. आता वाच्यब्रह्म म्हणजे काय ते सांगतो. जे वाचेने बोलता आले त्याला वाच्यब्रम्ह म्हणतात. अनुभवाचे कथन वाचेशिवाय शक्य नाही. म्हणून जे सांगितले जाते त्याला अनुभव ब्रम्ह असे म्हणतात. तर आनंद हा सृष्टीचा धर्म आहे, म्हणून त्याला आनंदब्रम्ह असे म्हणतात. ब्रह्मानंद हा तदाकार असल्याने अभेद असते आणि सांगता येत नाही. सगळ्यात शेवटी अनिर्वाच्य ब्रह्म येते. त्याचे वर्णन करता येत नाही. अशी १४ ब्रह्म अनुक्रमाने सांगितली. साधकांनी ती जाणली असता त्यांना भ्रम होत नाही. ब्रह्म शाश्वत आहे असे जाणावे, माया म्हणजे अशाश्वत, असा हा चौदा ब्रह्माचा सिद्धांत आहे. शब्दब्रम्ह हे शाब्दिक असते. तिथे अनुभव नसतो. त्यामुळे शाश्वताचा विचार त्यात नाही. जे क्षर नाही आणि अक्षरही नाही तेथे कसले मितिकाक्षर? शाश्वताचा विचार तिथेही दिसत नाही. खं ब्रह्म असे वचन असले तरे शून्याला ज्ञान नष्ट करते, त्यामुळे शाश्वताचे अधिष्ठान तिथेही दिसत नाही.
सर्व गोष्टींना अंत आहे त्यामुळे सर्वब्रह्म नाशवंत आहे कारण प्रलय निश्चितपणे होणार असे वेदांतशास्त्रामध्ये म्हटले आहे. ब्रह्मप्रलय झाल्यावर भूतांचा समूदाय तिथे कसा राहील? म्हणून या सर्व ब्रह्माचा नाश आहेच. अचल असलेल्याला चल, निर्गुणास गुण लावले तर आकार विलक्षण मानता येत नाही. जी पंचभूते निर्माण झाली आहेत ती प्रत्यक्ष नाशवंत आहेत. त्यावर सर्व ब्रम्ह मात करेल असे कसे घडेल? अशा तऱ्हेने विविध ब्रम्हांची माहिती संत समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत. पुढील माहिती ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127