(रत्नागिरी)
विष प्राशन केलेल्या तरुणाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विशाल चंद्रकांत सुर्वे (३१, रा. मु. पो. भावेवाडी बसस्टॉपजवळ, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.
विशाल सुर्वे याने अज्ञात कारणावरून २४ डिसेंबर २०२३ रोजी विष प्राशन केले होते. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच २५ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत राजारामपुरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर हा रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याने कोणत्या कारणातून विष प्राशन केले होते हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.