जय जय रघुवीर समर्थ. पाहिलेल्या दृश्यातील शुद्ध लक्षांश मात्र तो पूर्वपक्ष म्हणजे खोटा आहे. त्याचा स्वानुभव आला तो महत्त्वाचा. ज्या ठिकाणी आकाश गाळून सांडले आहे तो अनुभवाचा गाभा आहे. हे आकाश आहे अशी जाणीवही सोडल्यावर आकाशत्वाचा जो सूक्ष्म अनुभव उरेल तोहि शेवटी मीत्याच होय. कारण येथेही हा अनुभव झाला आला तो मी अतिसूक्ष्म असणारच. अंतःकरणातील मीपणाच्या जाणिवेची छाननी करून तिचा त्याग केल्यावर येणाऱ्या भवनच्या पोटातही मी त्याग केला ही सूक्ष्म कल्पना राहत असल्याने हा अनुभवही मिथ्याच होय. खोट्या कल्पनेतून जो निर्माण झाला त्याला खरेपण कसे असेल? म्हणून तिथे अनुभवाचे वर्णन करता येत नाही. दुसरेपणा नसतानाचा अनुभव हे बोलणेच व्यर्थ आहे. त्यामुळे अनुभव सांगता येत नाही. अनुभव घेणारा, अनुभव आणि अनुभवाची वस्तू ही त्रिपुटी निर्माण होते, तेव्हा अद्वैतात द्वैत लाजते म्हणून त्याला अनिर्वाच्य अनुभव असे म्हणणे योग्य ठरेल.
दिवस आणि रात्र यांचे वर्णन करायचे असेल तर त्यामध्ये मूळ सूर्य आहे, सूर्य जर निघून गेला तर उरलेल्याला काय म्हणायचं? भाषण आणि मौन यांचे मूळ ओंकार आहे. तो ओंकार गेला तर उच्चार कसा करायचा? अनुभव आणि अनुभव घेणारा हे सगळे मायेमुळे आहे. माया नसेल तर त्याला काय म्हणायचे? वस्तू एक आणि आपण एक असा वेगळेपणा असेल तर अनुभव तुम्हाला सांगता येईल. वेगळेपण आला कारण असणारा मी निवृत्तीपासून निर्माण होत असल्याने तिला वांझेची संतती असे म्हणावे लागेल म्हणून अभिन्नता हीच मूळची आहे. अविनाशी आत्मा निजला होता त्याने ‘मी जेव्हा जीव आहे’ असे स्वप्न पाहिले मग तो संसारात दुःखामुळे सद्गुरुला शरण गेला. सद्गुरूच्या कृपेमुळे सगळा संसार खोटा ठरला. त्याला ज्ञान झाले आणि मग अज्ञानाचा पत्ता विचारायला लागला! आहे असे वाटणारे नाहीसे झाले आणि नाहीपण नाही म्हणून विरले, त्यामुळे आहे, नाही हे दोन्ही गेले आणि काहीच उरले नाही. शून्यत्वाच्या पलिकडचे शुद्ध ज्ञान त्याने झाले समाधान.
ऐक्यरुपाने अभिन्न होऊन सहज स्थिती उत्पन्न झाली व त्याचे निरुपण झाल्यावर द्वैताची वार्ता नाहीशी झाली. ज्ञानचर्चा बोलताना जागृती आली. श्रोत्यांनी सावधान व्हावे, अर्थामध्ये मन घालावे, ही खूण पटताच समाधान मिळवावे. ते तुमच्या अंतर्मनासच कळेल. जितके ज्ञान सांगितले, तितके स्वप्त्नावारी गेले आणि शब्दांच्या पलीकडे असलेले अनिर्वाच्य सुख उरले. तिथे शब्दाशिवाय ऐक्य आहे. अनुभव न घेता अनुभव आहे, अशा निवांत स्थितीत जागृती मध्ये आली. स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले, जागृत जागा झाल्यावर जागृती आली त्यामुळे शब्द कुंठित झाला, ते समजेना असे झाले.
या निरुपणाचे मूळ प्रांजळपणे सांगितल्यावर अंतकरण निवळते आणि मूळ समाधान कळते. तेव्हा शिष्याने विनवले, तुम्ही हे आत्ता सांगितले ते मागे बोलले होते ते मला कळण्यासाठी पुन्हा सांगावे. अजन्मा कोण आहे? त्याने कोणते स्वप्न पाहिले? त्याचे निरूपण कसे केले आहे? शिष्याचा प्रश्न ऐकून स्वामी त्याला उत्तर देत आहे तेसुद्धा श्रोत्यांनी अत्यंत लक्ष देऊन ऐकावे. शिष्या ऐक, तू अजन्मा आहेस हे जाण. तू स्वप्नामध्ये स्वप्न पाहिले ते आता सांगतो. स्वप्नांमध्ये स्वप्नाचा विचार म्हणजे हा संसार! इथे तुला मी सारासार विचार सांगितला आहे. सद्गुरुला शरण गेल्यावर शुद्ध निरूपण केले या ज्ञानात चर्चेची प्रत्यक्ष खूण मी तुला सांगतो. याचा अनुभव घेतल्यावर सगळे बोलणे व्यर्थ आहे मीपणा विरहित स्थिती म्हणजेच जागृती
. ज्ञान गोष्टींचा गलबला संपून अर्थ प्रकट झाला, त्याचा विचार केला तर नंतर मनामध्ये अनुभव आला. तुला हीच जागृती वाटते, आपल्याला अनुभवाची प्राप्ती झाली असे वाटते असं वाटत असेल तर ती भ्रांती असून ती दूर झालेली नाही. असे समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकुया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127