(रत्नागिरी)
सांडपाण्यामुळे दुर्गंधी येते. त्यामुळे तुम्ही पाणी बंद करा अथवा औषध टाका असे सांगितले. त्याचा राग मनात धरुन मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर भिकू ओरपे, गौरव सुधाकर ओरपे, सुशांत सुधाकर ओरपे अशी संशयितांची नावे आहेत. सदर घटना शनिवारी (ता. ३०) सकाळी पावणेआठच्या सुमारास ओरपेवाडी- लाजूळ येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश भागा ओरपे व संशयित हे शेजारी बाजूलाच राहणारे आहेत. संशयितांनी त्यांच्या घराचे सांडपाणी साठवण्यासाठी प्रकाश ओरपे यांच्या घराच्या किचन रुमचे बाजूला राखा पाडलेला असून त्यात संशयित हे घराचे सांडपाणी साठवतात. त्यामुळे पाण्याच्या दुगंधीचा वास प्रकाश यांच्या घरात येतो, शनिवारी फिर्यादी प्रकाश यांच्या पत्नीने तुम्ही पाणी बंद करा अथवा त्यात औषध टाका असे सांगितले, याचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. फिर्यादी हे सोडविण्यासाठी गेले असता चिव्याच्या बांबूने त्यांच्या डोक्यावर पाठीवर मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी प्रकाश ओरपे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.