( राजेंद्रप्रसाद मसुरकर, ९९६०२४५६०१ )
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचं यंदा साठावं म्हणजे हीरक महोत्सवी वर्ष. कोविडच्या साथीने उदभवलेल्या परिस्थितीमुळे दोन वर्षं बंद राहिलेल्या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतला पहिला प्रयोग झाला विवेक गरुडलिखित ‘प्रतिमा- एक गाणे’ या नाटकाचा. संगमेश्वर तालुक्यातील मुचरी इथल्या ‘राजयोग कलामंच’ या संस्थेने ते सादर केलं. मनोहर सुर्वे यांनी ते दिग्दर्शित केलंय. प्रवीण धुमक यांच्या सूचक मांडणी केलेल्या नेपथ्याने कथानकाला साजेशी वातावरण निर्मिती केली होती.
नाट्यक्षेत्राला जीवनाचा मार्ग बनविण्याची जबरदस्त इच्छा मनात असणारी आणि त्यासाठी न्यायाधीश असणाऱ्या वडिलांच्या विरोधालाही न जुमानता घराबाहेर पडलेली प्रतिमा ही युवती या नाटकाची नायिका आहे. तिच्याच शब्दांत सांगायचं तर ‘आनंदाच्या प्रवासा’साठी ती निघाली आहे. या प्रवासात तिला भेटणाऱ्या नाट्यक्षेत्रातीलच व्यक्ती आणि ती यांच्यातील संबंधांची गुंतागुंत उलगडताना हे नाटक आयुष्यात येणाऱ्या निरनिराळ्या संघर्षांचं, अंतर्विरोधांच वेगवेगळ्या प्रकारे होणारं प्रकटीकरण दाखवतं.
‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ अर्थात ‘एनएसडी’मध्ये प्रतिमा नाट्यकलेचं शिक्षण घेऊ लागलीय. तिचा आणि तिचा पत्रमित्र बन्सी यांच्या पत्रव्यवहाराने नाटकाचा प्रारंभ होतो. रंगमंचावर दोन टोकांना दोघं बसलेली आहेत. तिचं पत्र तो वाचतो तेव्हा त्याच्यासमोर कागद असतो नि तिचा आवाज येत असतो. शेवटी ‘प्रतिमा’ हे पत्रलेखिकेचं नांव तो उच्चारतो. त्याचं पत्र ती वाचते तेही अशाच रीतीने! या सादरीकरणातून या प्रयोगातील नवीनता ध्यानात येऊ लागते.
सेटच्या मध्यभागी फ्लॅटच्या गॅलरीत उघडतो त्या पद्धतीचा मोठा दरवाजा. त्याच्या दोन्ही बाजूंना चित्रांचे मोठे कॅनव्हास. त्यातलं वाळवंटात चालणाऱ्या उंटांचं चित्र लक्ष वेधून घेतं. दुसऱ्या बाजूला भिंतीवर टांगलेली न्यायदेवतेची तसबीर नि खाली वकिलांच्या कचेरीत असतात तसल्या पुस्तकांचं कपाट. खरं म्हणजे तो सेटमधला भाग आहे, पण खऱ्या रॅक आणि पुस्तकांऐवजी मोठ्या चित्राने तो दाखवलाय. प्रतिमाचे वडील वरिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश, त्यांच्या पेशाला शोभेलशी पार्श्वभूमी आहे ती.
प्रतिमा एक मनस्वी कलावंत आहे. कलेची उपासना, कलेचा आस्वाद आणि कलेतून आनंद हा तिचा मार्ग तिनेच निवडलाय. न्यायाधीश वडिलांची इच्छा की तिने गणितात प्रावीण्य मिळवून रँग्लर ही त्या विषयातली सर्वोच्च बहुमानाची पदवी प्राप्त करावी. पण प्रतिमाला ते मान्य नाही. तिच्या भावाने वडिलांच्या इच्छेखातर चित्रकलेचा छंद बाजूला ठेवून ‘हार्वर्ड’मधून मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. प्रतिमाने मात्र नाट्यक्षेत्राचा मार्ग निर्धाराने निवडला.
या मार्गाने वाटचाल करताना तिच्या आयुष्यात वडील आणि आणखी चौघे येतात. वडिलांच्या, कदाचित थोड्या अधिक वयाचे राजाजी हे ‘एनएसडी’चे प्रमुख. ग्रीक नाट्यशास्त्राचे त्यांनी वर्गात दिलेले धडे प्रतिमाला पटत नाहीत. ती त्यात बदल करून प्रयोग करू पाहत. ते नाटक तसंच झालं पाहिजे या मताशी ठाम असलेले राजाजी तिला परवानगी नाकारतात. प्रतिमाला ते कलावंत असण्यापेक्षा प्रशासक अधिक आहेत हे कळून चुकतं. तिला त्या नाटकांना आधुनिक बाज द्यायचाय. सगळं कथानक पात्रांनी सादर केल्यावर ‘म्हणून मुलांनो, तुम्हीही बोध घ्या’ या थाटाचं निवेदकाचं प्राचीन ग्रीक पद्धतीचं भाष्य तिला नकोय. ग्रीक ऑर्केस्ट्राऐवजी देशी संगीत ती त्यात आणू पाहतेय.
तिची वाट सोपी नाहीच. पण ती मागे वळत नाही. आपल्या स्वप्नातला गांव केव्हातरी सापडेल हा आशावाद तिला साथ देतो. बन्सी हा आधी पत्रमित्र आणि मग प्रत्यक्ष भेटलेला तरुणही अशाच स्वप्नामागे फिरणारा. “हे भिकेचे डोहाळे, बाहेर अंधार आहे,” असं जेव्हा त्याचे काका म्हणाले होते तेव्हा “असुदे, मी माझी एक पणती लावीन,” असं उत्तर देऊन निर्धारानं बाहेर पडलेला.
दरम्यान, प्रतिमाबरोबर नाट्यशास्त्र शिकणाऱ्या देवाशीषबरोबर तिचं रेशमी नातं जुळतं. पण वैचारिक भेदामुळे त्यांचे रस्ते वेगळे होतात. त्याला नाटक करून मोठं व्हायचंय, खूप पैसा मिळवायचाय, तिला पैसा, मोठेपणा यांचा उबग आलाय. त्याच्या नाटकात मिळणारी भूमिकाही तिच्या मनातल्या नायिकेशी जुळत नाही, ती नकार देते. “माझीच मी, एकटीच मी, प्रवासात मी” हे पालुपद म्हणत ती भटकत राहते. अनेक दिशा, अंधार, भांबावलेपण याने थकून जाते. आपण एकट्या आहोत, भोवताली भलं मोठं शून्य आहे या वास्तवाच्या जाणिवेनं दमून झोपी जाते…..
आणि तिला जाग येते “केसरिया..…. ” या राजस्थानी गायनाच्या स्वरांनी, ती मोहोरते.
“मला गांव दिसलं, स्वप्नातलं गांव! ही भारून टाकणारी पहाट, हे स्वच्छ दाणेदार सूर… आणि तो चेहरा, आनंदी चेहरा, निश्चयी चेहरा,” तिचं निवेदन बन्सी हरवून, हरखून ऐकत राहतो.
प्रतिमा सांगत असते, “…. तो राजस्थानी तरुण बोलू लागतो, लढाई असेल छोटी, पण हिम्मत मोठी, तीच दाखवतो आम्ही.” मी समजावून घ्यायला लागले त्याला, त्याच्या राजस्थानला.
“आमच्या ठेक्यानं तुमचे पाय नाचले नाहीत तर पुन्हा येणार नाही इथं” हा त्याचा आत्मविश्वास तिला प्रभावित करतो.
आपल्याला हव्या असलेल्या नाटक जगण्याच्या उन्मुक्त आनंद शोधण्याच्या प्रवासात तिला भेटलेल्या या राजस्थानी जयसिंगमुळे कलेवर, तिच्या अभिजातपणावर प्रेम करण्याचा मार्ग तिला गवसतो, त्या मार्गावर चालणं सुखद वाटू लागतं. “बदल घडतच राहणार आहे, आणि या बदलांमुळे नवनिर्मिती होणार आहे. …. माझं गांव, माझी भूमी, माझा रंगमंच” असं म्हणत स्वतःभोवती गिरक्या घेत आनंदात न्हाऊन निघते.
तिचं हे निवेदन ऐकता ऐकता बन्सीच्या मनातला गोंधळही नाहीसा होतो, तिच्यापुढे नतमस्तक होऊन तो पुढच्या प्रवासाला निघतो. प्रतिमाच्या मुख्य भूमिकेत आहे आसावरी आखाडे. नाट्यकलेचा आस्वाद घेण्याची तळमळ असणारी युवती तिने उत्कटतेने सादर केलीय. विविध प्रसंगातील तिचा मुद्राभिनय, आनंदाचा शोध घेत हरवून जाणं, गिरक्या घेऊन आनंद व्यक्त करणं जेवढ्या ताकदीने साकारलंय, तेव्हढ्याच ताकदीने संघर्षाच्या वेळेचं ठाम राहणं नि दुःखाच्या प्रसंगी कोलमडून पडणंही साकारलंय.
उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित न्यायाधीशाच्या आतील मूळची दाबून टाकलेली कविता, मुलगी न जुमानता निराळ्या वाटेने निघते तेव्हा बाप म्हणून होणारी तगमग राजेश रेडीज यांनी रंगमंचावर चांगली व्यक्त केलीय. राजाजींची भूमिका दिग्दर्शक सुर्वे यांनीच केलीय. एका प्रथितयश संस्थेच्या प्रमुखपणामुळे प्राप्त झालेला लौकिक आणि वाढतं वय यांतून स्वभावात आलेला हेकेखोरपणा त्यांनी परिणामकारक रीतीने दाखवलाय.
हे नाटक दोन पिढ्यांमधल्या वैचारिक अंतरावर, संघर्षावर, विचारांच्या गोंधळावर आणि कला नि कलावंत यांच्याकडे हात राखूनच पाहण्याच्या समाजाच्या वृत्तीवर कलात्मक रीतीने भाष्य करून जातं.