(रत्नागिरी)
हळदीच्या कार्यक्रमातील किरकोळ कारणातून दाम्पत्याला तिघांनी मारहाण केली. ही घटना शनिवार २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वा. जुनी तांबट आळी येथे घडली. शशांक खोतरा (रा. तांबटआळी, रत्नागिरी), साई पोटफोडे, रसाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मिलिंद मधुकर सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शनिवारी ते पत्नी आणि मुलीसह तांबटआळी येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी १ वा हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी जमलेल्या लोकांना कार्यक्रम संपलेला असून तुम्ही आता आपआपल्या घरी जा, असे सांगितले. याचा राग आल्याने तिन्ही संशयितांनी मिलिंद सावंत यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात आणि चहेऱ्यावर मारुन दुखापत केली. तसेच त्यांची ज्युपीटर दुचाकीवर दगड मारत नुकसान केले.
दरम्यान, मिलिंद सावंत यांची पत्नी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिच्याही कानाखाली हातांच्या थापटांनी मारहाण करत तिला ढकलून खाली पाडले. या प्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम ३२४, ३२३,५०४, ५०६, ३४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.