रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरीचे सुपुत्र, ‘मुंबई दूरदर्शन’चे माजी सहसंचालक आणि ज्येष्ठ माध्यम सल्लागार जयु भाटकर यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर ‘हिंदुजा रुग्णालया’त नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉ. विवेक शेट्टी यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. जयु भाटकर यांची प्रकृती सुधारत आहे.
अलीकडेच सेवानिवृत्त झालेले जयु भाटकर ठाणे येथील निवासस्थानी फरशीवर सांडलेले पाणी लक्षात न आल्याने पाय घसरून पडले. दुखापत झाल्याने त्यांना उठता येईना, कसेबसे उठून ते ठाणे येथील रुग्णालयात दाखल झाले. तेथे तपासणी झाल्यावर दुखापतीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना ‘हिंदुजा’मध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डाव्या मांडीला कमरेजवळ हीप रिप्लेसमेंट सर्जरी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आपल्या असंख्य चाहत्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने आपण या संकटातून सुखरूप बचावलो असे म्हणून या प्रसंगी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे जयु भाटकर यांनी आभार मानले.