(संगमेश्वर)
मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात प्रामाणिक काम करतो. मी कोणत्याही विरोधकांसारखे मागच्या दाराने भेटणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे तुमची अंडीपिल्ली माझ्याकडे आहेत. मी संयमी राजकारणी असून, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. या भागात श्रेय लाटणारी आणि खोटं बोलणारी टोळी फिरत आहे. त्या टोळीपासून सावध राहा. कडवई गटात विरोधकांचा सुपडा साफ केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटात शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी अनेक गावातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सामंत व किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. या सभेसाठी लोकं गावागावातून गाड्या करून आले होते.
या वेळी पालकमंत्री सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, कडवई जिल्हा परिषद गटावर कोणाची मक्तेदारी नाही. काही लोकांना पक्षात येण्यासाठी मी विनंती केली होती. याचा अर्थ आम्ही हतबल नाही. परंतु तुम्ही नाहीत तर समोर बसलेले हजारों कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे आजच्या गर्दीने दाखवून दिले. इथला जिल्हा परिषद गटाचा सदस्य समोरच्याच डीपॉजिट घालवून निवडून आणण्याची शपथ आम्ही आज घेतली असल्याचे सामंत यांनी सांगितले.
कडवई जिल्हा परिषद गटात पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले म्हणजे विरोधकांचे उलटे दिवस सुरू झाले असल्याचे त्यांनी समजून जावे. मी गेली २५ वर्ष राजकारणात आहे. राजकारणामधील चांगला अनुभव असून भल्याभल्यांना वटणीवर आणले आहे. दादागिरी करून कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर या जिल्ह्याचा पालकमंत्री उदय सामंत आहे इतकं मात्र लक्षात ठेवावं असा इशाराही यावेळी सामंत यांनी विरोधकांना दिला.
या कार्यक्रमाला संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, चिपळूण तालुकाप्रमुख शरद शिगवण, माजी सभापती कृष्ण हरेकर, युवासेना तालुकाप्रमुख निहार कुवळे, सिद्धेश ब्रीद यांची आई ज्योती ब्रीद, वडील मारूती ब्रीद, अनिस खान, मनोहर गुरव, माजी सभापती मनीषा गुरव, वसंत उसगावकर, रूपेश घाग, ओंकार चव्हाण, बाळ इंदळकर, बंड्या मयेकर यांच्यासह १२ गावातील गावकर, सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य, आणि शेकडोंच्या संख्येने सिद्धेश ब्रीदवर प्रेम करणारे शिवसैनिक उपस्थित होते.
कामचोर कार्यकर्त्यांना सामंतांचे चिमटे
या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना पालकमंत्री सामंत यांनी चांगलेच चिमटे काढले. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान होईल. मात्र, जो कार्यकर्ता काम करणार नाही त्यांनी कोणत्याच पदाची अपेक्षा करू नका, निवडणुकीचे तिकीट देताना मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करेन असे सांगत कामचोर पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री सामंत यांनी सज्जड दम दिला. तसेच ‘सिद्धेश ब्रीद यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल असून, त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी मी घेतली आहे. त्यामुळे कडवई जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. असेही सामंत यांनी उपस्थित कार्यकत्यांना सांगितले.
जिल्हा परिषद आपल्याला जिंकायचीच…
‘कडवईमध्ये माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या कार्यालयातून समाजोपयोगी कामे केली जातील. समाजाला अभिप्रेत असणारी शिवसेना या परिसरामध्ये वाढवण्याच्यादृष्टीने कार्यरत राहील. या भागात शाखा लावायच्या नाही, इथे कार्यालय उघडायचे नाही, आम्ही आमचे सातबारे कोणाच्या नावावर केलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा परिषद आपल्याला जिंकायचीच आहे. अशी सूचना वजा विनंती यावेळी सामंतांनी संगमेश्वर तालुकाध्यक्ष यांना केली.