(चिपळूण / ओंकार रेळेकर)
वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसतर्फे दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये ”वाशिष्टी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन” २०२४ कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात दिनांक ६ रोजी ‘उत्कृष्ठ पशुधन तर दिनांक ७ रोजी पाककला स्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धेच्या नाव नोंदणीला तसेच महिला बचत गटांच्या स्टॉलला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या मे. वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रकल्पाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा मार्ग मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना आणखी रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या पाहिजेत. या उद्देशाने वाशिष्टी डेअरी प्रकल्पातर्फे ५ ते ७ जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत असणार आहे.
या महोत्सवात दिनांक ६ जानेवारी रोजी उत्कृष्ठ पशुधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय- म्हैस, सुदृढ निरोगी सुंदर म्हैस, सुदृढ -सुंदर- गाय, सुदृढ- निरोगी- सुंदर म्हैस- वासरू, सुदृढ- निरोगी- सुदंर गाय -वासरू, सुदृढ- निरोगी- सुंदर बैल या प्रकारात ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेते पशुधन मालक प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी पशुधन मालकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेतील नियम व अटी पुढीलप्रमाणे- सुदृढ/ निरोगी/ सुंदर गाय व म्हैस वासरू यांना १ वर्ष वय मर्यादा असेल. दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनस्थळी वासरू घेऊन येणे. जादा दूध देणारी म्हैस व गाय स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता प्रदर्शनस्थळी जनावर घेऊन येणे आणि पंचांच्या समोर जनावरांचे दूध काढून मोजल्यानंतर अंतिम निर्णय होईल. सुदृढ / निरोगी/ सुंदर जनावर स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपले जनावर सजवून दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शन स्थळी जनावर घेऊन येणे. त्यानंतर शोमध्ये पंचांच्या समोर पाहणी झाल्यानंतर अंतिम निकाल होईल. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यापूर्तीच मर्यादित राहील.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहोळा ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क- ९६३७६०५७५७/७७२२०४५०४८, ९४२२६६११९७ यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच महिलांसाठी दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील नियम व अटी पुढीलप्रमाणे वाशिष्टी दुग्धजन्य पदार्थांपासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज अशी थीम आहे. एकच स्पर्धक गोड आणि तिखट पदार्थ वाशिष्टी डेअरीच्या प्रोडक्ट्स पासून बनवू शकतात. दोन्हीला वेगवेगळे गुण दिले जातील. सजावटीसाठी व पदार्थ बनवण्यासाठी खाद्यपदार्थांचा वापर करावा. ( प्लास्टिकच्या वस्तू वगैरे नसाव्यात ). पदार्थ पौष्टिक असावा. पदार्थ बनवायला जास्तीत जास्त कालावधी एक तास असेल. जो पदार्थ आपण बनवणार आहात त्याची रेसिपी व कृती एका कागदावर स्वच्छ अक्षरात लिहून आणणे व त्यासाठी लागणारा वेळ आयोजकांना आधी कळवावा. जेणेकरून तशा बॅचेसचे नियोजन करता येईल. गोड पदार्थ व तिखट पदार्थ असे दोन वेगवेगळे नंबर काढले जातील. चव, सजावट, नाविन्य आणि पौष्टिकता याला प्राधान्य देण्यात येईल. रेसिपी बनवताना व्हेज की नॉनव्हेज रेसिपी याचा उल्लेख करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील बक्षीस वितरण त्याच ठिकाणी संध्याकाळी ४ वाजता जाहीर करण्यात येईल.
या स्पर्धांसह महिला बचत गटांच्या स्टॉलला तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या स्टॉलसाठी १०० महिला बचत गटांनी नाव नोंदणी केली आहे. या बचत गटांच्या स्टॉलमध्ये विविधता असणार आहे. यामध्ये कपडे, ज्वेलरी, बुरुड यांसारखे वेगवेगळे स्टॉल असणार आहेत. कोकणात प्रथमच भव्य अशा कृषी महोत्सवात १०० महिला बचतगटांच्या स्टॉलची नोंदणी झाल्याचे समोर येत आहे.
तरी या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे. या स्पर्धांची जय्यत तयारी सुरू आहे. या कृषी महोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असणार आहे.