(चिपळूण)
करारपत्राने विक्री केलेल्या डंपरची पूर्ण रक्कम दिली नाही व बँकेतील हप्तेही भरले नाहीत. त्यामध्ये सुमारे ११ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार येथील पोलिस स्थानकात झाली असून, पोलिसांनी संबंधित खरेदीधारकावर बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजेश नागनाथ क्षीरसागर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद प्रतीक दत्ताराम दाभोळकर (पाग गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) यांनी दिली आहे. राजेश क्षीरसागर ओळखीचा असल्याने दाभोळकर यांनी आपल्या मालकीच्या डंपरची (एमएच ०८ डब्लू ८२०४) ५ मार्च २०१९ रोजी नोटरी करारपत्राद्वारे त्याला विक्री केली होती, मात्र, क्षीरसागर याने ठरल्याप्रमाणे दाभोळकर यांचे डंपरचे हप्ते फेडले नाहीत. डंपरचा ताबाही स्वतःकडे ठेवून क्षीरसागर त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्वतःसाठी वापर करीत आहे. क्षीरसागर याने डंपर स्वतःकडे ठेवून तसेच वाहनाचे हप्ते न फेडता डंपरमध्ये सुमारे ११ लाख ८३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.