(रत्नागिरी)
उसनवारी घेऊन गेलेल्या कपड्यांचे पैसे दिल्यानंतरच तुला पुन्हा कपडे मिळतील असे सांगितल्याच्या रागातून दुकानात तलवार नेऊन तेथील काच फोडत दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. सन्मित्र नगर येथील ओम एन्क्लेव येथील रुबाब या रेडीमेड कपड्यांच्या दुकानात घडली होती.
नागेश प्रकाश गजबार (२८, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात दुकान मालक मुबीन जैनुद्दीन मिरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यापूर्वीही नागेश त्यांच्या दुकानातून उधारीवर कपडे घेउन गेला होता. बुधवारी दुपारी १ वा. सुमारास तो आणखी काही कपडे उधारीवर घेण्यासाठी दुकानात गेला असता मिरकर यांनी त्याला तू आधीच्या कपड्यांचे पैसे दिल्यानंतरच तुला पुन्हा कपडे मिळतील, असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन सायंकाळी ६.४५ वा. राकेश गजबार हातात तलवार घेउन जबरदस्तीने दुकानात घुसला त्याठिकाणी त्याने मुबीन मिरकर यांना शिवीगाळ व मारहाण करत दुकानाची काच फोडून नुकसान केले.
याप्रकरणी मिरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम ३२३,५०४,५०६ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४,१२५ सह ३७ (१), १३५ तसेच जबरदस्तीने दुकानात प्रवेश केल्याप्रकरणी ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला. गुरुवारी नागेशला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली