(नवी दिल्ली)
दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर विकल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डेटा बँकेतून डेटा लीक करण्यात आला. त्यानंतर डार्क वेबवर विक्रीसाठी अपलोड करण्यात आला होता. या सर्व आरोपींना १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र याबाबात आता खुलासा झाला आहे.
सर्व आरोपींना तीन वेगवेगळ्या राज्यांतून अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये हरयाणा, ओडिशातून प्रत्येकी एक आणि झाशीतून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी एका गेमिंग प्लॅटफॉर्मवर भेटले आणि त्यांनी झटपट पैसे कमवण्यासाठी डेटा हॅक करून डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डार्क वेब ही अशी जागा आहे, जिथे इंटरनेट युजर्साचा डेटा वेगवेगळ्या किमतीत विकला जातो.
डार्क वेब हे इंटरनेटचे ते जग आहे, ज्यात तुम्ही तुमच्या ब्राउझरद्वारे प्रवेश करू शकत नाही. दरम्यान, आपण सर्व इंटरनेटच्या जगात प्रवेश करण्यासाठी जे ब्राउझर वापरतो ते फक्त ४ टक्के आहे. उरलेले ९६ टक्के डार्क वेब किंवा इंटरनेटचे काळे जग आहे.
डार्क वेबवर पोहोचणे सोपे नाही आणि जरी येथे पोहोचता आले तरी हॅकर्सपासून दूर राहणे अवघड असते. इंटरनेटच्या या काळ्या जगात लोकांचा डेटा खुलेआम विकला जातो. डार्क वेबमध्ये याबाबत सर्व माहिती मिळते, जी सामान्य सर्च इंजिनवर इंडेक्स केलेली नसते. वेबसाईटची माहिती, लोकांचा वैयक्तिक डेटा, बँकांची माहिती इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टी, या वेबवर खरेदी-विक्री केल्या जातात.
अमेरिकन सायबर सिक्युरिटी आणि इंटेलिजेंस एजन्सी रीसिक्युरिटीने सर्वप्रथम याची दखल घेतली. एजन्सीला आढळलं की थ्रेट अॅक्टर ‘pwn0001’ यानं ९ ऑक्टोबर रोजी ब्रीच फोरमवर ८१.५ कोटी भारतीयांचा डाटाबेस विकला जात असल्याचा दावा करणारी एक थ्रेड पोस्ट केली होती. देशाची लोकसंख्या १४८.६ कोटी आहे, म्हणजेच जवळपास ५५ टक्के भारतीयांचा डाटाबेस ऑनलाइन उपलब्ध आहे. यावरून हा डेटा किती भयावह आहे, याचा अंदाज येतो. pwn0001 ने पुरावा म्हणून आधार डेटा असलेले चार मोठे लीक सँपल्स पोस्ट केले आहेत. एका सँपलमध्ये १ लाख नोंदी आहेत.