(संगलट / वार्ताहर)
सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे भाड्याने राहत असलेल्या खेड येथील विवाहितेचा तिच्या चुलत दिरानेच खून केल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आली होता. त्यानंतर या खून प्रकरणी ताब्यात असलेला संशायित संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
खेड येथील विवाहिता चैत्राली निलेश मेस्त्री हिला मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिचा चुलत दीर संदेश मेस्त्री याने गोवा येथे कामानिमित्त जाण्याच्या निमित्ताने सावंतवाडीत आणले होते. त्यानंतर सावंतवाडी सबनीसंवाडा येथील एका घरात तो तिच्या मुलासह भाड्याने राहत होता. काही दिवसांपूर्वी याच भाड्याच्या घरात तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र, पोलीस तपासात त्यानेच तिला जबर मारहाण करून ओढणीने गळफास लावून खून केला असल्याची बाब उघड झाली होती. यानंतर सोमवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवा उडवीची भाषा केली होती. मात्र, पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. विशेष म्हणजे तिला भिंतीला आपटल्याने ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला गळफास लावून त्याने आत्महत्या असल्याचा बनाव रचला होता. त्यानंतरही ती जिवंत आहे कि मेली हे पाहण्यासाठी त्याने स्टोव्ह पेटवून तिच्या पायांना चटके देखील दिले होते. या खूनप्रकरणी संशयित संदेश मेस्त्री याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्याने त्याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.