(वाडनगर)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात येण्याआधी चहा विकला होता, असे आपण ऐकले असेल. गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर मोदींनी चहा विकला होता. एक चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, हा मनातही न येणारा विचार मोदींनी खरा करून दाखवला आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही गोष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींचे वडील दामोदर दास मोदी यांचा वाडनगर स्टेशनवर चहा विकण्याचा छोटासा व्यवसाय होता. लहानपणी नरेंद्र मोदी देखील चहा विकण्यासाठी आपल्या वडिलांना मदत करत असत.
गुजरातमधील वाडनगर रेल्वे स्टेशनवर असलेले मोदींचे चहाचे दुकान आता पर्यटनस्थळ बनणार आहे. नरेंद्र मोदी लहानपणी ज्या ठिकाणी चहा विकायचे, त्या ठिकाणी असलेल्या स्टॉलचे रूपांतर पर्यटनस्थळात करण्याचा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आता ते ठिकाण संरक्षित करण्यात येणार आहे. सध्या नरेंद्र मोदींचा चहाचा स्टॉल काचेच्या आवरणाने संरक्षित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, चहाच्या स्टॉलचे स्वरूप कींवा स्थिती बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले आहे. ते चहाचे दुकान मोडकळीस आले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी नुकताच या स्थळाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चहाच्या स्टॉलचे रूपांतर पर्यटनस्थळात करण्याचा तसेच त्याचे संवर्धन करून देखभाल करण्याचा निर्णय घेतला आहे.