जो परमेश्वराला जाणतो त्याचे नाव संत. तो शाश्वत आणि अशाश्वत यामध्ये निवाडा करतो. देव निश्चित आहे, असा ज्याचा अनुभव आहे तो महानुभावी संत साधू. जो सर्वसामान्यांमध्ये राहतो मात्र सामान्यांपेक्षा वेगळ्या गोष्टी सांगतो, ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान जागृती झालेली असते तोच साधू होय. परमात्मा हा निर्गुण आहे यालाच ज्ञान म्हणावे त्यापेक्षा वेगळे ते सर्व अज्ञान. पोट भरण्यासाठी नाना विद्यांचा अभ्यास केला जातो त्याला ज्ञान म्हटले जाते पण ते ज्ञान नव्हे, त्यामुळे सार्थक होत नाही. देवाची ओळख पटणे हेच खरे ज्ञान होय. बाकीचे सर्व निरर्थक पोटविद्या. जन्मभर पोट भरले, देहाचे संरक्षण केले, पुढे अंतकाळी सगळे व्यर्थ गेले. पोट भरण्याचा विद्येला सद्विद्या म्हणू नये. याच जन्मी ईश्वरी साक्षात्कार होणे हेच खरे ज्ञान. ज्याच्यापाशी हे ज्ञान आहे तोच सज्जन. त्यालाच समाधान म्हणजे काय असते ते विचारले पाहिजे.
अज्ञानाला अज्ञानी भेटतात तेव्हा ज्ञान कसे सापडेल? करंट्या माणसास करंट्याचे दर्शन होताच भाग्य कसे उजाडेल? रोग्यापाशी रोगी गेला तिथे त्याला आरोग्य कसे लाभेल? दुर्बलापाशी दुर्बळ गेला तर त्याची पाठराखण कोण करीळ? पिशाच्चापाशी पिशाच्च गेले तर त्याचा काय उपयोग होईल? उन्मत्ताला उन्मत्त भेटले तर त्याला कोण समजावणार? भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली, दीक्षा नसलेल्याकडे दीक्षा मागितली, कृष्ण पक्षांमध्ये उजेड पाहायला गेले तर ते मिळेल कसे? बेशिस्त व्यक्ती बेशिस्तापाशी गेला तर तो शिस्तबद्ध कसा होईल? बध्द असलेल्यास बध्द भेटला तर तो सिद्ध होणार नाही. देहापाशी देही गेला तर तो विदेही कसा होईल? म्हणून ज्ञात्यावाचून ज्ञानमार्ग नाही, त्यामुळे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचार करून मोक्ष प्राप्त करावा. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे देवशोधन नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक सहावे समास दुसरा उपदेशाची लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ. उपदेशाची लक्षणे ऐका ज्यामुळे सायुज्य प्राप्ती होते. नाना मतांचा काथ्याकूट उपयोगी पडणार नाही. ब्रह्मज्ञानाविना उपदेश हा विशेष म्हणू नये. धान्य सोडून भुसा खांण्यासारखेच ते आहे. नाना प्रकारचा कडबा आणून तो बडवला किंवा ताक घुसळले किंवा अन्न धुतलेले पाणी सावकाश सेवन केले, नाना सालींचे भक्षण केले, नाना चोयट्ट्या चोखाल्या, खोबरे सोडून करवंटी खाल्ली त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञानावाचून नाना उपदेशांचा शीण होय. सारं सोडून असार कोण शहाणा सेवन करील? आता निर्गुण ब्रह्माचे निरूपण केले ते श्रोत्यांनी अंतःकरणपूर्वक ऐकावे. संपूर्ण सृष्टीची रचना म्हणजे ही पंचमहाभूते परंतु ती सर्वकाळ टिकणारी नाही. आदि अंती निर्गुण ब्रह्म आहे, हीच शाश्वताची खुण आहे. बाकीचे पंचभौतिक जग नाशवंत आहे.
या भुतांना देव कसे म्हणावे? मनुष्याला भूत म्हटले की वाईट वाटते. ब्राह्मादिकाला देखील ज्याचा महिमा कळत नाही त्या जगन्नायक परमात्मा आणि त्याला भुताची उपमा? भुतासारखा जगदीश असे म्हणताना दोष उत्पन्न होतो हे महापुरुष जाणतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांच्या आत-बाहेर जगदीश आहे. हे पंचमहाभुतांना नाश आहे, मात्र त्यातील आत्मा अविनाशी आहे. जे जे रूप आणि नाम तो सगळा भ्रम आहे. नामरूपातीत गुपित अनुभवाने जाणावे. अशी ही अष्टधा प्रकृती, पंचमहाभूते आणि त्रिगुण आहे. अष्टधाप्रकृतीस दृश्य असे नामाभिधान आहे. दिसणारे सगळे नाशवंत असते असे वेद-श्रुती बोलतात. निर्गुण ब्रह्म शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात. हा भाग येथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127