(अहमदनगर)
पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसांत पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन, अशा हेड कॉन्स्टेबलच्या पत्राने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या रामनाथ भाबड या हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे पोलिस कर्मचा-याने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. पोलिस हेड कॉन्स्टेबलने लिहिलेल्या पत्रात म्हटले की, दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. पोलिस कर्मचा-याने हे पत्र पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे. पत्राचा फोटो आता व्हायरल होत आहे.
पत्रात म्हटले की, पदोन्नती करताना पक्षपातीपणा, भ्रष्टाचार झाला आहे. पदोन्नती मार्कांनुसार आणि सेवाज्येष्ठतेनुसार झाल्याचे दिसून येत नाही. यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार केल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत मार्कानुसार आणि सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न काढल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. याची जबाबदारी अहमदनरच्या पोलिस अधीक्षकांची राहील असेही पत्रात म्हटले आहे.