(मुंबई)
मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंद नोटीस बजावण्यात आली आहे. बीकेसी येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याने ही नोटीस देण्यात आली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रोपाठोपाठ बुलेट ट्रेनचे काम करणार्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली. मुंबई प्रदूषित करणार्या सरकारी प्रकल्पांची आधी पाहणी करा, असे म्हणत हवेच्या गुणवत्तेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. प्रकल्प हिताचे असले तरीही पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची पाहणी करा, असा निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.