(मुंबई)
सद्यस्थितीला जगभरातील टेक दिग्गज AI शर्यतीत एकमेकांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत. दररोज AI जगतात नवनवीन शोध लागत आहेत. AI च्या नकारात्मक प्रभावांबद्दल महिलांना धोका निर्माण होऊ शकतो, एका सर्व्हेतून हे समोर आलं आहे. कोणतीही गोष्ट ही चांगल्या वापरासाठी, भल्यासाठी शोधली जाते, परंतू वाईट प्रवृत्ती त्याचा वापर वाईटासाठी करतात याचा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे.
एकीकडे AI आपल्यासाठी फायदेशीर आहे, तर त्याचे गंभीर तोटेदेखील आहेत. AI च्या माध्यमातून न्यूड फोटो तयार केले जात आहे. चुकीच्या गोष्टींमध्ये AI चा वापर केला जात असून त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात फोटो आणि व्हिडिओमधून कपडे काढण्यासाठी AI चा वापर करणाऱ्या अॅप्स आणि वेबसाइट्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
ग्राफिका नावाच्या सोशल नेटवर्क अॅनालिसिस कंपनीने ही माहिती शेअर केली आहे की, एआयच्या मदतीने कपडे काढण्याची सेवा देणाऱ्या या वेबसाइटला सप्टेंबरमध्ये 24 मिलियन लोकांनी भेट दिली आहे. न्यूडिफाई नावाच्या या बहुतेक सर्विस मार्केटिंग करण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. डीप फेकने खळबळ उडविलेली असताना एखाद्या महिलेचे नग्न फोटो वापरून वाईट प्रवृत्तीचे लोक काहीही घडवून आणू शकतात, अशी भीती तज्ञांना वाटू लागली आहे.
रिपोर्टनुसार, X आणि रेडिटवर अशा लिंक्सच्या संख्येत वाढ झाली आहे जी वापरकर्त्यांना फोटो आणि व्हिडिओमधून कपडे काढण्याची परवानगी देते. विशेषतः बहुतांश सर्विसेस केवळ महिलांच्या फोटोंवर काम करतात. सोशल मीडियावरून महिलांचे फोटो काढले जातात आणि मग ते निर्वस्त्र करून शेअर केले जातात, अस या अहवालात म्हटले आहे. अशा लिंक्सची संख्या वाढली आहे.
अशा अॅप्स आणि वेबसाईटवरून कोणाचाही डीपफेक पोर्नोग्राफी व्हिडिओ बनवता येतो. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या सायबर सिक्युरिटी डायरेक्टर इवा गॅलपेरिन यांनी सांगितलंय की, शाळकरी मुलांपासून ते सर्वसामान्यापर्यंत दररोज अशा अॅप्स आणि वेबसाइट्सचा वापर केला जात असल्याने ही चिंतेची बाब आहे.
डीपफेक टेक्नॉलॉजी कोणत्याही व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करू शकते. ‘Deep Learning’ आणि ‘Fake’ अशा दोन शब्दांपासून DeepFake हा शब्द तयार झाला आहे. ही टेक्नॉलॉजी खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी Generative Adversarial Networks (GANs) याचा वापर करते. यामध्ये केवळ या व्यक्तीचा चेहराच नाही, तर त्याचा आवाज, हावभाव, डोळ्यांच्या पापण्या, बोलताना होणारी ओठांची हालचाल, डोळ्यांचे भाव आणि अशा कित्येक गोष्टी कॉपी करता येऊ शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीचा काहीही बोलतानाचा व्हिडिओ तयार करता येऊ शकतो.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा पॉर्नोग्राफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एआयच्याच मदतीने हे फोटो शेअर देखील केले जात आहेत. हे एवढे भयंकर आहे की एखाद्या महिलेची बदनामी अगदी सहजरित्या केली जाऊ शकते. असे असले तरी या ॲप्सवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. या ॲप्सची पॉप्य़ुलॅरिटीदेखील यामुळेच वाऱ्याच्या वेगाने वाढू लागली आहे, ही महिलांसाठी धोक्याची घंटा आहे. तर महिलांनी आपले अनावश्यक फोटो सोशल मिडीयावर न टाकण्याची जागरुकता बाळगणे गरजेचे आहे.