(पुणे / प्रतिनिधी )
कलाप्रदर्शने पहायला कलाकारांनी अधिकाधिक रसिकांना निमंत्रित करावे . यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा . कलारसिकांनी कलाकृतींचा आस्वाद घेताना त्यातील बारकावे जाणून घ्यावे . कलाकारांनी रसिकांना कलाकृती समजावून सांगाव्यात आणि कलाकारांनी देखील अधिकाधिक कलाप्रदर्शनांना भेटी द्याव्यात ,असे आवाहन पुणे येथील ख्यातनाम आणि प्रयोगशील चित्रकार सुहास एकबोटे यांनी केले .
कोकणच्या संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांच्या चित्रांचे प्रदर्शन आज नातूबाग येथील पु . ना . गाडगीळ कलादालनात सुरु झाले . यावेळी उद्घाटन समारंभात सुहास एकबोटे हे बोलत होते . यावेळी चित्रकार सतीश सोनवडेकर , चित्रकार दत्ता हजारे , सुखम गॅलरीचे सचिन भुयेकर , मनाली सैतवडेकर , मोहन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते .
कलाकारांना आपल्या कलाकृती सर्वांसमोर सादर करता याव्यात यासाठी अजितकाका गाडगीळ यांनी पुणे येथे विविध ठिकाणी गॅलरी उपलब्ध करुन दिल्या यासाठी अजितकाकांना आपण व्यक्तिशः धन्यवाद देतो . या संधीचा कलाकारांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहनही एकबोटे यांनी केले . चित्रकार विष्णू परीट यांची चित्रे म्हणजे कोकणचा निसर्ग पुणे येथील रसिकांच्या भेटीला आल्यासारखे वाटत असल्याचे गौरवोद्गारही सुहास एकबोटे यांनी काढले .
चित्रकार विष्णू परीट यांनी , पु . ना . गाडगीळ कलादालन उपलब्ध करुन दिल्याबद्दल संचालकांना धन्यवाद दिले . याबरोबरच सुखमचे सचिन आणि मनाली यांनी आपल्या कलाकृती घरी येवून ताब्यात घेत सर्वांना फ्रेम केल्या आणि त्या गॅलरीत लावे पर्यंत सर्व व्यवस्था पाहिली यासाठी सुखमला परीट यांनी धन्यवाद दिले . आपले बंधू चित्रकार दत्ता हजारे यांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक वेळी ते आपल्या पाठी ठाम राहिल्याचे चित्रकार विष्णू परीट यांनी सांगितले . आपली पत्नी वनिता आणि सारे परीट कुटूंबीय आपल्या नेहमीच पाठीशी राहिल्याने आपण कलाक्षेत्रातील हा प्रवास यशस्वीपणे करु शकलो असेही परीट यांनी नमूद केले . या प्रदर्शनात चित्रकार विष्णू परीट यांच्या निसर्गावर चितारलेल्या २५ कलाकृती मांडण्यात आल्या आहेत . अत्यंत कष्टप्रद जीवनातून आपण वाटचाल केल्याने आपल्या कलाकृतीत भावना व्यक्त होताना दिसतात आणि आपल्या कलाकृती रसिकांना आनंद देण्यासाठी असतात आणि पहाणाऱ्याचे मन प्रफुल्लित व्हावे असा आपला प्रयत्न असल्याचे परीट यांनी नमूद केले .
यासर्वच कलाकृती एकापेक्षा एक सुंदर असल्याने पुण्यातील रसिकांनी या कलाप्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन चित्रकार सतीश सोनवडेकर यांनी केले आहे . उपस्थित सर्वांसह गॅलरी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पु . ना . गाडगीळ संचालक मंडळ आणि सुखमला धन्यवाद देत सोनवडेकर यांनी आभार प्रदर्शन केले . आज उद्घाटनाच्या दिवशीच प्रमुख पाहुणे असणाऱ्या चित्रकार सुहास एकबोटे यांनी चिपळूण येथील वाशिष्ठी दर्शन हे चित्र खरेदी करुन उत्तम सुरुवात केली . हे प्रदर्शन १७ डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी १० : ३० ते रात्री ८ : ३० पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे .