(रत्नागिरी)
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी २१० शेततळे खोदण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज मंजुरीनंतर लाभार्थी शेतकऱ्याने त्यांचा सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करायची आहेत. त्यानंतर शेतकऱ्याने मंजूर आकारमान शेततळे खोदल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला अनुदान त्याच्या खात्यावर जमा होईल. या योजनेंतर्गत सात प्रकारचे आकारमान असलेली शेततळी यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
जास्तीत जास्त ७५ हजार इतके अनुदान शेततळ्यासाठी देय आहे. अनुदान रक्कम शेततळ्याच्या आकारमानानुसार राहणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ग्रामपातळीवरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुन्हाडे यांनी केले आहे.