(खेड)
ई-लिलाव विक्रीच्या जाहिरातीनुसार खरेदी केलेल्या सदनिकेच्या व्यवहारात बँक अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकेच्या चार अधिकाऱ्यांसह मूळ सदनिकाधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १२ लाख ७३ हजार ११० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी गजेंद्र विठ्ठलदास खेडेकर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार बँक ऑफ इंडियाच्या लोटे (ता. खेड) शाखेचे विभागीय व्यवस्थापक दवे, व्यवस्थापक धीरजकुमार, अधिकारी कांबळे व राव यांच्यासह मूळ सदनिकाधारक राकेश एकनाथ कोळी (पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरणे येथील समर्थ काळकाई कृपा येथील निवासी सदनिका क्रमांक ए-१०१ याबाबत ई-लिलाव विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार गजेंद्र खेडेकर यांनी ही सदनिका १२ लाख १ हजाराला खरेदी केली होती. दुय्यम निबंधकांकडे नोंदणी प्रक्रियेसाठी ७२,११० रुपये त्यांनी खर्च केले होते. त्यानंतर त्यांनी सदनिकेचा ताबा मिळविण्यासाठी बँकेकडे विनंती केली होती.
या सदनिकेचे मालक तानाजी परशुराम कदम यांना राकेश कोळी यांनी संपूर्ण मोबदल्याची रक्कम अदा केलेली नसल्याने त्यांना ताबा देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडे सदनिकेचा कब्जा न आल्याने बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी विभागीय कार्यालय आणि लोटे शाखेकडे हस्तांतरण झालेले नाही. बँक अधिकाऱ्यांना माहिती असूनही त्यांनी राकेश कोळी यांच्याशी हातमिळवणी करून खोटे व खोडसाळ कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.