(चिपळूण / ओंकार रेळेकर)
समग्र चतुरंग संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी तर चिपळूण केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त एका दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन चतुरंग प्रतिष्ठानने, कोकणची सांस्कृतिक नगरी असलेल्या चिपळूणमध्ये नियोजित केले आहे.
सांस्कृतिक – सामाजिक – शैक्षणिक अग्रणी चतुरंग प्रतिष्ठान संस्था आणि कलाक्षेत्रात चोखंदळ रसिकांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले चिपळूण शहर यांचे एक अनोखे सांस्कृतिक नाते आहे. सातत्याने नवनवीन उपक्रमांच्या निर्मितीसाठी ओळखली जाणारी चतुरंग प्रतिष्ठान संस्था यावर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करते आहे. जुळून आलेला सुंदर योगायोग असा की ह्याच टप्यावर संस्थेच्या चिपळूण केंद्राने रौप्यमहोत्सवी वर्षाच्या टप्यात प्रवेश केला आहे. खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या चिपळूण, रत्नागिरी, गोवा, मुंबई, डोंबिवली, पुणे या प्रत्येक केंद्रावर विशेष कार्यक्रम होत आहे. पण चिपळूण केंद्रावर असा विशेष दुहेरी योग जुळून आल्यामुळे, अडीच दशके प्रेमळ जिव्हाळ्याचा आणि लक्षणीय रसिकतेचा प्रतिसाद देणाऱ्या चिपळूणकरांसाठी काही खास भेट द्यावी असा चतुरंग मानस प्रत्यक्ष कृतीत आणून प्रतिष्ठानने भरगच्च अशा ‘रुपेरी सोनेरी रंगसोहळा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
खास सुट्टीचा दिवस असलेल्या, सोमवार दि.२५ डिसेंबर (नाताळ सुट्टी) या दिवसभरात दीर्घ मध्यांतरासह दोन सत्रांमध्ये वेगवेगळ्या ४ कार्यक्रमांचे व २ समारंभी सोहळ्यांचे आयोजन इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले आहे. या महोत्सवी कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ठीक ९.३० वा. ‘शिवतांडव’ अशा शीर्षकाखालील पखवाज वादन जुगलबंदीने होणार आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध पखवाज वादक – पखवाज गुरु श्री. कृष्णा साळुंके यांचे ५ सहकाऱ्यांसह होणारे अनोखे पखवाज सहवादन रंगसोहळ्याचा दणदणीत, दणकेबाज शुभारंभ करून देणार आहे. त्यानंतर या महोत्सवी कार्यक्रमातील आकर्षणाचा बिंदू वाटू शकेल असा औपचारिक उद्घाटन सोहळा होईल. आकर्षण अशा अर्थाने की एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वसाधारणपणे एकच व्यक्ती श्रीफळ वाढवून किंवा फीत कापून किंवा दीप प्रज्वलन करून करीत असते. या चतुरंगी सोहळ्यात मात्र, चिपळूणातील २५ मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येईल. कसे ते प्रत्यक्ष पाहणे, अनुभवणे… हेच आकर्षक असेल !
कोणत्याही कलाविष्कारी कार्यक्रमात हवीहवीशी वाटणारी संगीत मैफल इथेही आयोजित करण्यात आली आहे. भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य, पुणे येथील गायक आनंदगंधर्व श्री.आनंद भाटे त्यांची ‘आनंदरंग’ मैफल सादर करतील. यात बंदिश, भजन, ठुमरी, बालगंधर्व गीते आणि नाट्यगीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. यानंतर चक्क ३ तासांचे दीर्घ मध्यांतर असेल. उद्देश असा की लोकांनी आपापल्या घरी जाऊन आरामात जेवावे.. वाटलं तर छोटीशी झोप-डुलकीही काढावी. आणि फ्रेश होऊन पुढचा आनंद घेण्यासाठी पुन्हा सांस्कृतिक केंद्रात यावे.
रंगसोहळ्याचे दुसरे सत्र सायंकाळी ठीक ४-०० वाजता सुरू होईल. आपल्या लक्षवेधी अशा ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’ आणि ‘नृत्यरूप ज्ञानेश्वर’ अशा लक्षवेधी नृत्यकार्यक्रमांनी चिपळूणकरांना अचंबित, मनमोहीत केलेल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना – नृत्यगुरू सौ. सोनिया परचुरे, यावेळी सोबत २० नृत्यकलावंतांसह ‘भगवती’ हा ‘देवी नृत्य यज्ञ’ स्वरुपाचा कार्यक्रम सादर करतील. ज्यामध्ये नवदुर्गांचे अवतार का, कशासाठी, कसे घेतले गेले.. याचे दर्शनीय श्रवणीय नृत्यस्वरूप पाहावयास मिळेल. या खास कार्यक्रमाचे लेखन आणि गीतरचना आपल्या कोकणातील फुणगूस गांवच्या शेतकरी- कलावती असलेल्या लेखिका-कवयित्री-दिग्दर्शिका- नृत्यांगना सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी केलेले आहे.यानंतर रौप्य – सुवर्ण टप्यावर होणाऱ्या या रंगसोहळ्याचा केंद्रबिंदू म्हणावा अशा ‘कृतज्ञता समारंभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
चतुरंगच्या पंचविशी- पन्नाशीच्या वाटचालीत संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून संस्थेच्या पायाभूत उभारणीचे शिल्पकार असलेल्या कोकणातील आदरणीय व्यक्तिमत्वांचा, मान्यवरांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान- गौरव करणारा सोहळा संपन्न होईल. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूर्तीशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर हे या समारंभाचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतील.दिवसभराच्या या महोत्सवी कार्यक्रमाचा समारोप बांसरी-पखवाज-तबला अशा वाद्यजुगलबंदीने होईल. लोकप्रिय बांसरी वादक पं. रोणू मुजुमदार, रसिकप्रिय पखवाज वादक पं. भवानीशंकर आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद आझाद यांची ‘त्रिनाद’ ही वाद्य जुगलबंदी सादर होईल…गायनरंग.. वादनरंग.. स्वागतरंग.. नृत्यरंग.. साहित्यरंग.. संगीतरंग.. कृतज्ञतारंग.. अशा सप्तरंगी कार्यक्रमांची रेलचेल असणारा हा ‘चतुरंग रंगसोहळा’ रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. एवढ्या मोठ्या बहुरंगी रंगसोहळ्याच्या पूर्णोत्सवी प्रवेशिका चतुरंगने अगदी नाममात्र मूल्याच्या (रू.७५०, रू.५५० फक्त) ठेवल्या असून, त्या चतुरंग चिपळूण कार्यालय(बस स्टँड जवळ, सारस्वत बँकेच्या वर) आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे गुरुवार २१ डिसेंबर पासून उपलब्ध होतील. तपशिलासाठी रसिकांनी जाहिरातींकडे लक्ष ठेवावे. त्याचप्रमाणे चतुरंगच्या ‘आस्वादयात्री योजने’ तील सभासदांनाही या रंगसोहळ्यात सामावून घेतले जाणार असून, त्याची निरोप-पत्र-चिठ्ठी सभासदांकडे मोबाईल द्वारे व्यक्तिगतरित्या पाठविली/कळविली जाणार आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी त्यांनी चतुरंग कार्यालयात सकाळी ११-३० ते सायं. ६-०० या वेळेत संपर्क साधावा. अशा या भव्योदात्त कार्यक्रमाचा चिपळूण आणि परिसरातील रसिकांनी आपल्या मित्रमंडळींसह आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चतुरंगने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.