(रत्नागिरी)
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात झालेल्या प्रत्येक आंदोलनात अग्रणी असलेले मच्छीमार बांधव आता रिफायनरी विरोधात मैदानात उतरले आहेत. दि. ७ रोजी साखरीनाटे व राजवाडी येथील ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना भेटून त्यांना रिफायनरी व क्रूड ऑईल टर्मिनल विरोधाचे ठराव दिले.
प्रशासन-शासन दरबारी रिफायनरी विरोधकांना विश्वासात घेण्याचे बोलले जात असले तरी मात्र दुसरीकडे रिफायनरी होऊ नये यासाठीचा विरोध तीव्र होताना पाहायला मिळत आहे. रिफायनरी बाबत जसजशी शासनाची पाऊले पुढे येतात अगदीं तशाच प्रकारे रिफायनरी विरोधक ही आपला लढा यशस्वी करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे. एकूणच, रिफायनरीबाबत दिवसेंदिवस शासनाची डोकेदुखी वाढत आहे.
यामध्ये साखरीनाटे मच्छीमार सहकारी सोसायटी व साखरी नाटे महिला मच्छी व्यावसायिक सहकारी सोसायटी यांच्याबरोबर राजवाडी ग्रामसभेने रिफायनरी, पेट्रोकेमिकल झोन, क्रूड ऑइल टर्मिनल, बंदर, सिंगल पॉईंट मुरिंग आदी आंबोळगड तिवरे किनारी नको असे ठराव केले होते. बारसु सोलगाव येथील ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून यापुढे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाविरोधात संघर्ष करण्याचेही मच्छीमार बांधवांनी निश्चित केले.
यावेळी माजिद गोवळकर, कारीम फणसोपकर, मूहिद खादू, नंदकुमार हळदणकर, मुबारक गैबी, सिकंदर हतवडकर, सिराज बांदिवडेकर, सीद्देश सातुर्डेकर व सलीम सोलकर उपस्थित होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन गाजविणारे साखरी नाटे गाव आता रिफायनरी विरोधी आंदोलनात सक्रिय झाले आहे.
लवकरच आंदोलनाची हाक
नाटे, साखरी नाटे, आंबोळगड, राजवाडी ही गावे रिफायनरी प्रकल्पग्रस्त आहेत. या गावांतील ग्रामस्थांनी नाटे परिसर रिफायनरी विरोधी संघटना स्थापन केली असून, लवकरच या संघटनेतर्फे आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे.