(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे वाहनाच्या सर्व काचा बंद करुन त्यात मादा जातीच्या श्वानाला कोंडून ठेवल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहनमालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 9 डिसेंबर रोजी दुपारी 2.26 वा.उघडकीस आली.
प्रशांत सुभाष माळी (36) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहनमालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात ॠषीराज दत्तात्रय जोशी (23) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवार 9 डिसेंबर रोजी गणपतीपुळे येथील वरदविनायक पे अॅन्ड पार्क येथे संशयिताने आपल्या मालकीचे वाहन (एमएच-15-इपी-8199) मध्ये वाहनाच्या सर्व काचा बंद करुन त्यात अंदाजे 8 महिन्याचे मॉन्ग्रेल मादा जातीचे श्वान कोंडून ठेवले होते. यावेळी श्वानाला हालचाल करता येईल व श्वास घेता येईल याची काळजी न घेतल्यामुळे श्वानाचा गुदमरुन मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित प्रशांत माळी विरोधात भादंवि कायदा कलम 428,प्राण्यांना कु्ररतेने वागणूक देणेस प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.