(संगलट / वार्ताहर)
सावंतवाडी सबनीसवाडा येथील घरात भाड्याने राहणाऱ्या खेड येथील एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३२) असे तिचे महिलेचे नाव आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होत अधिक तपास सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला ही मुळची खेड (रत्नागिरी) येथील आहे. ती आपला दिर संदेश यांच्या समवेत सबनीसवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत होती. शनिवारी दुपारी तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. हा प्रकार दिराच्या लक्षात आल्यानंतर त्याने ओढणी सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाठ सुटली नाही. त्यामुळे ओढणी जाळून तिचा मृतदेह खाली उतरवला. परंतु तत्पूर्वी तिचे निधन झाले होते. याबाबतची माहिती त्याने ११२ नंबरच्या माध्यमातून पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. मात्र, तिने आत्महत्या नेमकी का केली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, उपनिरिक्षक गजानन भालेराव, आनंद यशवंते, पोलीस हवालदार प्रसाद कदम, रामदास जाधव, संतोष गलोले आदींनी घटनास्थळी जात अधिक तपास सुरु केला आहे.