(गुहागर)
गुहागर तालुक्यातील मौजे उमराठ येथील नवलाई देवीची सहाण येथे शनिवार दि. ९.१२.२०२३ रोजी ग्रामपंचायत उमराठ तर्फे पारंपरिक कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात मार्गदर्शक म्हणून गुहागर आॅर्गनिक प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी, नियंत्रण निरिक्षक (इन्स्पेक्टर) तेजस तेलगडे, सुरज पालकर, संकेत रावणंग, साहिल बेंडल आणि ईशान कळझुनकर लाभले होते. सुरुवातीला सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मंदार जोशी आणि सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त करून शिबीराची सुरूवात केली.
ग्रामपंचायत उमराठच्या माध्यमातून ग्रामपंचायत उमराठच्या कार्यक्षेत्रातील उमराठ आणि उमराठ खुर्द या दोन्ही महसुली गावांतील प्रत्येकी २० ते २५ शेतकऱ्यांच्या गटाचे श्री देव भराडा सेंद्रिय उत्पादक गट, श्री नवलाई सेंद्रिय उत्पादक गट, वनराई सेंद्रीय उत्पादक गट आणि देवराई सेंद्रिय उत्पादक गट असे चार सेंद्रीय उत्पादक गट काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. या चारही गटांतील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा मध्यंतरी गुहागर कृषी विभागातर्फे दापोली कृषी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर आता पारंपरिक कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार जोशी आणि त्यांच्या सहकारी टीमने पारंपरिक शेती म्हणजे काय? पारंपरिक शेती मध्ये आढळणारे दोष दूर करत नापीक होत चाललेल्या जमीनीला पुन्हा सुपीक बनवण्यासाठी सेंद्रिय शेती कडे वळले पाहिजे. ही काळाची गरज आहे आणि अधिक उत्पादन कसे घेतले पाहिजे, याबाबत महत्वपुर्ण उपयोगी असे सविस्तर मार्गदर्शन पहिल्या सत्रात केले.
तर दुसऱ्या सत्रात जमिनीचा कस (उत्पादन क्षमता) वाढवण्यासाठी देण्यात येणारी सेंद्रिय खतां(टाॅनिकां) पैकी जीवाअमृत जैविक(टाॅनिक) शेतकऱ्यांनी स्वतः कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणात उमराठच्या सुमारे ४०/५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता. सदर शेतकरी प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी उमराठच्या माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, सर्व सेंद्रिय गटाचे अध्यक्ष, सचिव, पोलीस पाटील वासंती आंबेकर तसेच ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व उपसरपंच सुरज घाडे यांनी मोलाचे सहकार्य केले. समारोप प्रसंगी शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानले.