(रायगड / चंद्रकांत कोकणे)
रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा फलक लावुन आतमध्ये मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात होते. याबाबत खोपोली पोलीसांना माहिती मिळाली होती.
पोलीसांनी ही गोपनीय माहीती वरीष्ठांना कळवली.
उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विक्रम कदम व खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी मध्ये छापा घातला असता यामध्ये पक्का माल असलेली पावडर नार्को इन्स्पेक्शन कीट (Narco Inspection kit ) द्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) असल्याचे निष्पन्न झाले. याची किंम्मत १०७ कोटी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
दिनांक ०७/१२/२०२३ रोजी पोलीस पथकाने मौजे ढेकु गावचे हद्दीत इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनीत प्रवेश केल्यानंतर कंपनीचे चालक यांचेकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शासनाचा कोणताही वैध परवाना मिळून आला नाही. त्या ठिकाणी उग्र वास येत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :- १). जप्त केलेला तयार मुद्देमाल – रु.१०६५ दशलक्ष किमतीचे एकूण वजन ८५ किलो २०० ग्रॅम. डी. पावडर २). जप्त केलेला कच्चा मुद्देमाल – रु. १५,३७,३७७/- किंतीची एम. डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने मिळाली. ३).जप्त केलेला इतर मुद्देमाल – रु. ६५,००,०००/- किंमतीची रासायनिक प्रक्रीयेसाठी असेंबल केलेली साधन सामग्री मिळाली.
वरील सर्व मुद्देमालाची एकुण किंमत १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये (अक्षरी रुपये एकशे सात कोटी तीस लाख सदतीस हजार तीनशे सत्याहत्तर मात्र ) असुन सदर मुद्देमाल व मालमत्ता जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार(कोकण परीक्षेत्र),पोलीस अधिक्षक, रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक, रायगड अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(c), २२ (c) सह कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत हे करीत आहेत.