नाना क्षेत्रांची परीक्षा नाना घरांची परीक्षा नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्काची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कलेची परीक्षा, नाना चातुर्यपरीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानाची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रुपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे. नेमके बोलणे, तात्काळ प्रत्युत्तर देणे, शीघ्रकवित्व करणे हे ज्ञान नव्हे.
नेत्रपल्लवी, नादकळा, करपल्लवी,भेदकळा, स्वरपल्लवी संकेतकळा, काव्य कुशल संगीत कला, नृत्य कला, सभा चातुर्य, शब्द कला हे ज्ञान नव्हे. वाग्वीलास, मोहनकला, रम्य रसाळ गायनकला, हास्यविनोद कामकला हे ज्ञान नव्हे. नाना लाघवे, चित्रकला, नाना वाद्य संगीतकला, का नाना प्रकारे विचित्रकला हे ज्ञान नव्हे. आदि करुनी चौसष्ट कला, यापेक्षा वेगळ्या नाना कला, चौदा विद्या, सर्व सिद्धी हे ज्ञान नव्हे. सगळ्या कलांमध्ये प्रवीण आहे, विद्येमध्ये परिपूर्ण आहे, कौशल्य आहे पण तरी त्याला ज्ञान म्हणताच येणार नाही. जे ज्ञाना सारखे वाटते पण मुख्य ज्ञान आहे ते वेगळेच आहे. जिथे संपूर्ण प्रकृतीही मिथ्या आहे.
दुसऱ्याच्या मनातले जाणावे हे खरे ज्ञान आहे असे वाटते पण हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. महाअनुभव हाच श्रेष्ठ आहे. मानसपूजा करताना चुकला, कोणीतरी बोलावले असे ते नाही. अंतरस्थिती जाणली त्याला परमज्ञाता म्हणतात, परंतु जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही तोपर्यंत तेही ज्ञान नाही. अनेक प्रकारची ज्ञाने ही आपल्याला दिसतात परंतु ज्याच्यामुळे सायुज्य मुक्ती होते ते ज्ञान वेगळे आहे. ते ज्ञान कसे आहे, त्याच्यामुळे समाधान मिळते ते मला वर्णन करून सांगावे. असे शुद्ध ज्ञान विचारले त्याची माहिती पुढच्या समासामध्ये देत आहे, श्रोत्यांनी पुढे अवधान दिले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बहुधाज्ञान नाम समास पंचम समाप्त
दशक पाचवा समास सहावा शुद्ध ज्ञान लक्षण
जय जय रघुवीर समर्थ.
आता ज्ञानाचे लक्षण ऐका. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपल्याला आपणच पाहणे म्हणजे ज्ञान. मुख्य देवाला जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्य अनित्य यांचा विचार करावा याला ज्ञान असे म्हणतात. जिथे दृश्य प्रकृती बाजूला होते, पंचमहाभूतांची जाणीव नष्ट होते, त्याला ज्ञान असे म्हणतात. मंन-बुद्धीला न समजणारे, जिथपर्यंत तर्क पोहोचत नाही, ज्याचा उल्लेख सगळ्यांच्या पलीकडचे असा होतो त्याला ज्ञान असे म्हणतात. जिथे दृश्यभान नाही, जिथे जाणीव हे अज्ञान आहे,त्याला शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात. सर्वसाक्षी तुर्यावस्था त्याला ज्ञान म्हणतात पण ते केवळ पदार्थ ज्ञान आहे. दृश्य पदार्थ पाहणे म्हणजे पदार्थज्ञान, शुद्ध स्वरूप जाणावे त्याला स्वरूपज्ञान म्हणतात. हा भाग येथे समाप्त झाला. पुढील कथा ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127