(मुंबई)
राज्यात 1.25 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, पण सरकार त्या जागांची भरती करत नाही. भाजप सरकार जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करत आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने “आदर्श शाळा” उपक्रमाची घोषणा करत आहे, हा सर्व हास्यास्पद प्रकार आहे. शाळेत शिक्षकच नाहीत तर शाळा आदर्श कशी होणार? असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे, शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबीन, तूर, धान, कापूस सर्व पीकं वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने तत्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचे काम केले पाहिजे पण सरकार मात्र पोकळ घोषणा करत आहे. याआधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. असा हल्ला त्यांनी यावेळी केला.
सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत राहिल असे आश्वासनही पटोले यांनी शेतकऱ्यांना केले.
राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपनेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत. आरक्षण प्रश्नावरून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरू असलेला कार्यक्रम आहे. ही सर्व नौटंकी सुरू असून राज्यातील जनतेला हे माहित आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.