( रत्नागिरी )
रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे येथे बोलेरोची हाईट गेजला धडक बसून अपघात झाला. या अपघातात लोखंडी बार तुटून दुचाकीवरुन जाणार्या दोघांवर पडल्याने जखमी झाल्याची घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली. पवनकुमार पाटील (34, कापडी कॉम्प्लेक्स, गयाळवाडी फाटा खेडशी), गिरीश निळकंठ जोशी (मुंबई) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यशवंत पिलणकर (कुवारबाव, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप घेवून कांचन हॉटेल कुवारबाव ते एमआयडीसी मिरजोळे असा जात होता. रस्त्यावरील हाईट गेजला जोरदार धडक दिली. या धडकेत लोखंडी बार तुटून बोलेरोच्या उजव्या बाजूने जाणार्या दुचाकीवरील दोघांच्या अंगावर पडला. यात पवनकुमार पाटील, यांच्या उजव्या खांद्याला, हाताला, मणक्याला गंभीर दुखापत झाली तर गिरीश पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.
याबाबतची फिर्याद पवनकुमार पाटील यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी बोलेरो चालक योगेश पिलणकर याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार टेमकर करत आहेत.