(नवी दिल्ली)
भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच कायम राहणार असल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टाफचा कालावधी वाढवण्यात आला आहे. विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविडला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्वीकारली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे. त्याशिवाय तो स्टॅण्ड इन मुख्य कोच राहणार असून राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे.
राहुल द्रविड याने गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय 2021-23 अजिंक्यपद चषकाची अंतिम फेरीही गाठली. तसेच 2023 विश्वचषक अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. राहुल द्रविडची दूरदृष्टी, व्यावसायिकता आणि अथक प्रयत्न हे भारतीय संघाच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
राहुल द्रविड म्हणाला की, टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. आम्ही एकत्रपणे चढ-उतार पाहिले आहेत आणि या संपूर्ण प्रवासात संघातील पाठिंबा आणि विश्वास कायम आहे. आम्ही ड्रेेसिंग रूममध्ये निर्माण केलेले वातावरण आणि संस्कृतीचा मला खरोखर अभिमान आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दूरदृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि पदाधिकार्यांचे आभार मानतो.