(उत्तरकाशी)
१२ नोव्हेंबरची पहाट, सूर्याचं डोकं नुकतंच वर येत होतं, हाडं गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला मंगळवारी १७ दिवस झाल्यानंतर प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने अखेर अडकलेल्या सर्व ४१ कामगारांची सुटका करण्यात आली आहे
उत्तरकाशीतील सिलक्यारा येथील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची मंगळवारी रात्री सुखरूप सुटका झाली. अवजड यंत्रे मोडली असताना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने हात टेकले असताना, रॅट मायनर्सने अद्भुत कामगिरी करीत चोवीस तासांपेक्षा कमी वेळेत 10 मीटरचे अंतर खोदून या मजुरांच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त केला. सातत्याने 17 दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले. मजुरांच्या सुरक्षित सुटकेसाठी सर्व तयारी झाल्यानंतर पाच मजुरांचा पहिला गट रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास बाहेर पडला आणि देशभर आनंदोत्सव करण्यात आला. ऐन दिवाळीच्या दिवशी हे मजूर अडकले होते. त्यांची सुटका होताच बोगद्याच्या परिसरात आतषबाजी करून जणू पुन्हा दिवाळी साजरी करण्यात आली.
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आल्यावर सिल्कयारा बोगद्यात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह म्हणाले की, आम्हाला जे काही हवे होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवले गेले. या मिशनमध्ये जेवढी संसाधने जमवली आहेत तेवढी इतर कोणत्याही ऑपरेशनसाठी जमवली नसती, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतूनही मोदी यांनी बचाव मोहिमेवर लक्ष ठेवले होते आणि ते संपर्कात होते. रॅट मायनर्सने केलेल्या कामगिरीमुळे अडकलेले मजूर आज बाहेर पडतील, असा विश्वास निर्माण झाला होता. बोगद्यात तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले, तसेच रुग्णवाहिकांचा ताफाही सज्ज ठेवण्यात आला होता.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Visuals from the Silkyara tunnel where the operation to rescue 41 workers is ongoing.
Manual drilling is going on inside the rescue tunnel and auger machine is being used for pushing the pipe. So far about 2 meters of manual… pic.twitter.com/oIMNAxvre2
— ANI (@ANI) November 28, 2023
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. चौधरी यांनी दिवसभर बोगद्याच्या परिसरात तळ ठोकला होता. दुपारनंतर ऐकू आलेला खोदकामाचा आवाज मजुरांसाठी आनंदवार्ताच होती. त्यांनी आपल्या कुटुबीयांना ही माहिती दिली. सुटका होताच मजुरांना वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले. सुटका झालेल्या मजुरांचे स्वागत पुष्करसिंह धामी यांनी केले. विजय होरो असे सर्वांत पहिले बाहेर आलेल्या मजुराचे नाव आहे. तो खुंटी येथील रहिवासी आहे. बाहेर येताच त्याने पत्नी आणि माता-पित्याची भेट घेतली. पुष्करसिंह धामी यांनी मजुरांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली आणि त्यांनी मागील 17 दिवसांत दाखवलेल्या उच्च मनोधैर्याचे कौतुक केले.
एनडीआरएफच्या या बचाव मोहिमेवेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंह घटनास्थळी उपस्थित होते. बोगद्यातून बाहेर आलेल्या मजुरांचे फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले. सर्व मजुरांची प्रकृती ठीक असून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद ओसंडत होता.आत अडकलेल्या अनेक कामगारांचे कुटूंबीयही यावेळी उपस्थित होते.
सर्व कामगारांच्या सुटकेनंतर धामी यांनी पत्रकार परिषद घेऊन या बोगद्याच्या बाहेर बाबा बौख नाग देवतेचे मंदिर बांधण्याची घोषणा केली. तसेच ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्याचेही जाहीर केले. या मजुरांना बाहेर काढताना एक क्रम ठरविण्यात आला होता, पाईप अरुंद असल्याने कमी उंचीच्या मजुरांना आधी बाहेर काढण्यात आले. यानंतर जास्त उंचीच्या मजुरांना बाहेर काढण्यात आल्याचे धामी यांनी सांगितले.
#WATCH | Visuals of the successful rescue of all 41 workers who were trapped inside the Silkyara tunnel in Uttarakhand since November 12. pic.twitter.com/IviyYAx0Me
— ANI (@ANI) November 28, 2023
‘‘उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावुक करीत आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की, तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमचे हे श्रमिक मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत, ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही. या धाडसाला आणि धैर्याला मी सलाम करतो.’’– नरेंद्र मोदी, पंतप्रधान