केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यातील मंत्री दीपक केसरकरांची तब्बल १२ वर्षांनंतर सोमवारी (२७ नोव्हेंबर) राणेंच्या सिंधुदुर्गातील घरी भेट झाली. डीएड विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी या प्रमुख प्रश्नासाठी दीपक केसरकरांना बोलावल्याचं नारायण राणेंनी सांगितलं आहे.आमच्यात कोणतेही मतभेद नसून कायमच संबंध चांगले असल्याचं स्पष्टीकरण दोन्ही नेत्यांनी दिलं. तसेच, पत्रकारच राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणातले कट्टर शत्रू समजले जाणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याचा प्रत्यय दिला. केसरकर यांनी 12 वर्षांनी नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
केसरकर आणि राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. हे दोघे 12 वर्षांनंतर राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेटले. जिल्ह्याच्या विकासासाठी राणे यांची भेट घेतल्याचे केसरकर यांनी सांगितले. तर आमचा संघर्ष वैयक्तिक नव्हे, तर राजकीय आणि वैचारिक होता, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगितले. आम्ही मुंबईतही भेटलो. आमचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत. आमच्यात कधी मतभेद होते, हे तुम्हीच दाखवा. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यावर भेट झाली नाही, असे त्यांनी सांगावे, असेही राणे म्हणाले.
राणेंची भेट नेहमीच जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असते आणि ते नेहमी विकासाबाबत चांगले मार्गदर्शन करतात. आम्ही लवकरच पुन्हा एकत्र बसणार आहोत. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी नवीन काय करता येईल, याबाबतची चर्चा होईल, असेही दीपक केसरकर यांनी भेटीबाबत स्पष्ट केले. आज काही डी. एड. बेरोजगार राणेंना भेटायला आले होते. म्हणून त्यांनी मला फोन केला, त्यामुळे मी आलो, असे केसरकर यांनी सांगितले. एकदा डी. एड. झाल्यानंतर त्यांना टीईटी देता आलेली नाही. या संदर्भात रत्नागिरीतील तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्त्वाप्रमाणे काम करायची तयारी आहे का, याबद्दल त्यांना विचारणा केल्याचे केसरकर म्हणाले.