(रत्नागिरी)
संविधानात १९७६ साली ४२ वी दुरुस्ती करताना मुलभूत ११ कर्तव्यांचा समावेश केला. ही कर्तव्ये सर्वांनी पाळलीच पाहिजेत. जसेच आपल्याला अधिकार हवेत तशी कर्तव्येही पाळली पाहिजेत. यातील एक महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे जे काम कराल ते सर्वोत्तमच करा. त्यामुळे हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले तर समाज, देश उत्तम काम करेल. संविधानाची जपणूक, अमलबजावणी करण्याकडे आपण सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. ते अंगिकारून वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य अॅड. डॉ. आशिष बर्वे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा समिती आणि अधिवक्ता परिषद रत्नागिरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने काल (ता. २६) आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात कार्यक्रम झाला. संविधानात आतापर्यंत १०६ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आले आहे. १९४९ सालीच अनुच्छेद ४४ मध्ये संविधानाने समान नागरी कायदा लागू करण्याची दिशा दिली, तरतूद करून ठेवली आहे. त्या दिशेने वाटचाल करायला हवी होती, ती आपण आज करत आहोत. म्हणजे घटनाकारांनी दिलेल्या दिशेने वाटचाल सुरू आहे. संविधान, क्रिमिनल लॉ सर्वांना समान प्रकारे लागू आहे. परंतु विवाह, घटस्फोट, सक्शेशन, अॅडॉप्शन या चार बाबतीमध्ये धार्मिक कायदे वेगवेगळे आहेत. हे कायदे रद्द करून तरतुदीप्रमाणे समान नागरी कायद्याकडे पाहिले पाहिजे, असेही अॅड. बर्वे म्हणाले.
कार्यक्रमात सुरवातीला संविधानाची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. रा. स्व. संघाचे नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये यांनी अॅड. बर्वे यांचा सत्कार केला. प्रास्ताविकामध्ये शाखाध्यक्ष अॅड. मनोहर जैन यांनी अधिवक्ता परिषदेची माहिती दिली. संविधान उद्देशिकेचे वाचन सर्वांनी केले. अॅड. प्रशांत पाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध लिमये यांनी गीत सांगितले. संतोष पावरी यांनी आभार मानले. श्रुतिका काटे यांनी संपूर्ण वंदेमातरम सादर केले.
दुचाकी फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, शाखाध्यक्ष अॅड. मनोहर जैन, अॅड. प्रिया लोवलेकर, समितीचे अध्यक्ष संतोष पावरी, अनिरुद्ध लिमये यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दुचाकी वाहन फेरीला सुरवात करण्यात आली. ही फेरी जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका, गाडीतळमार्गे स्वा. सावरकर यांना पुष्पहार अर्पण करून मुळ्ये भवन येथे पोहोचली. फेरीदरम्यान भारत माता की जय, एक देश, एक संविधान, महामानव डॉ. आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
फोटो :
राष्ट्रीय सेवा समिती व अधिवक्ता परिषद आयोजित संविधान दुचाकी वाहन फेरीत सहभागी दुचाकी.
संविधान दिन कार्यक्रमात व्याख्याते प्र. प्राचार्य अॅड. डॉ. आशिष बर्वे यांचा सत्कार करताना वैद्य महेंद्र पाध्ये. सोबत अॅड. मनोहर जैन, संतोष पावरी आदी.