( गणपतीपुळे/ वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे मानेवाडी येथील चंडिका मित्रमंडळ यांचे वतीने सलग तिसऱ्या वर्षी गणपतीपुळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर आकर्षक अशा भव्य दिव्य स्वरुपात या स्पर्धेचे गणपतीपुळे प्रिमियर लीग नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीतील क्रिकेट शौकिनांना मातब्बर खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी येथील चंडिका मित्रमंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक पिंट्या गावणकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि सर्वोत्तम नियोजनातून सलग तिसऱ्यांदा गणपतीपुळे प्रिमियर लीग स्पर्धेची यंदा गणपतीपुळ्यात पर्वणी क्रिकेट शौकिनांना पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेमध्ये लिलाव स्वरूपात रत्नागिरी तालुक्यासह गुहागर, संगमेश्वर, देवरुख,लांजा, राजापूर, चिपळूण आदी ठिकाणांहून दर्जेदार क्रिकेट खेळाडू येथील विविध संघ मालकांकडे सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा उद्घाटनाचा सलामीचा सामना नवलाई नांदेश्वर देवरुख विरुद्ध एन्जॉय ग्रुप जांभारी या दोन संघांमध्ये खेळविण्यात आला. यावेळी नवलाई नांदेश्वर देवरुख संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजयी मात करून स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेचे यूट्यूब चैनलच्या माध्यमातून कोकणवारी या यूट्यूब चैनल चे सर्वेसर्वा अमोल कोलगे यांच्या माध्यमातून प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेचे अत्यंत आकर्षक दर्जाचे नियोजन आणि आयपीएलच्या धर्तीवर बनवलेले हे मैदान पाहून उपस्थित पोलीस नाईक राहुल जाधव यांनी स्पर्धेचे प्रमुख संयोजक पिंट्या गावणकर व त्यांच्या सर्व सहकार्यांचे विशेष कौतुक केले. तसेच गणपतीपुळे गावचे खोत विजय भिडे यांनीही आपल्या मनोगतातून ग्रामदेवता ग्रामदेवता श्री चंडिकादेवी आणि श्री गजाननाच्या कृपेने ही स्पर्धा अशीच यशस्वीपणे पार पडेल अशा स्वरूपाच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. यावेळी या उद्घाटन कार्यक्रमाला गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्ये, पोलीस नाईक राहुल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल मधुकर सरगर, पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी, गणपतीपुळे गावचे खोत विजय भिडे, माजी सरपंच बाबाराम माने, ग्रामपंचायत सदस्य राज देवरुखकर माजी सदस्य अविनाश माने, पत्रकार वैभव पवार, शिवसेनेचे गणपतीपुळे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, उमेश भणसारी, जयवंत आग्रे, किशोर गुरव आदींसह विविध मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. गणपतीपुळे पंचक्रोशीतील ही भव्यदिव्य स्वरूपाची स्पर्धा पुन्हा एकदा भरविण्यात आल्याने येथील सर्वच क्रिकेटप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
या स्पर्धेची सांगता गणपतीपुळे येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्ये यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन तर मुख्य मैदानाचे उद्घाटन गणपतीपुळे पोलीस क्षेत्राचे पोलीस नाईक राहुल जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन सामन्याच्या नाणेफेकीचा कौल गणपतीपुळे चे माजी सरपंच बाबाराम माने यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रगीताची धून वाजवून उपस्थित खेळाडू, आयोजक क्रिकेट प्रेमींच्यावतीने मोठा आनंद व्यक्त करण्यात आला.